नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील कचरा संकलनासाठी 154 कोटींचा ठेका (Contract) थेट 354 कोटीवर जाऊनही घंटागाडी आणि वाद अद्यापही चर्चेत आहे.
कचरा संकलन ठेक्याच्या रकमेत दुपटीने वाढ करूनही घंटागाडीच्या तक्रारी आल्याने तत्कालीन प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आठ दिवसांत घंटागाडीच्या चौकशीचे आदेश पालिकेला दिले होते. दोन महिने उलटत असून अद्यापही घंटागाडी चौकशी पूर्ण होत नसल्याने यावरून उलटसूलटच चर्चा सुरू आहे.
घंटागाडी ठेकेदाराला क्लिनचीट देण्यासाठी वेळ घालवण्याचा आटापीटा सुरू असल्याच्या चर्चा पालिका वर्तुळात व्यक्त होताना दिसत आहेत. दरम्यान वादग्रस्त घंटागाडीच्या अनियमित कामांप्रकरणी नवनियुक्त आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नाशिक शहरात १ डिसेंबर २०२२ पासून ३९६ घंटागाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, सुरुवातीपासून कार्यरंभ आदेशातील अटी शर्तीनुसार काम केले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तक्रारींमध्ये साधारणपणे काही लहान घंटागाड्याचा वापर करणे, घंटागाड्याची उंची अधिक असल्यामुळे महिलांना कचरा टाकण्यात अडचणी येणे, अनेक ठिकाणी घंटागाडी अनियमित येणे आदी तक्रारी आहेत. यात कळीचा मुद्दा म्हणजे, ओला व सुका कचरा विलगीकरणच अनेक ठिकाणी बंद झाल्याच्या तक्रारी आहेत.
नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देत असताना लहान घंटागाड्यातून मोठ्या घंटागाडीत कचरा भरताना तो एकत्र केला जातो. जवळपास ८६ लहान घंटागाड्यातून मोठ्या गाडीत कचरा टाकताना हा गोंधळ होत असल्यामुळे या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभाग त्यास दाद देत नाही. यामुळे घंटागाडी ठेकेदारांविरोधात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तक्रार केली गेली.
यामुळे विभागीय आयुक्त गमे यांनी मे अखेरिस चौकशी समिती नियुक्त केली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाल्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिकेचा पदभार होता. काही दिवसांनी ते रजेवर गेल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी गंगाथरन डी काहीकाळ प्रभारी होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्याकडे प्रभार सोपवण्यात आले.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घंटागाडी अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर भाग्यश्री बानायत यांच्या काळात घंटागाडीच्या अनियमितते प्रकरणी चौकशीला सुरवात झाली. मात्र, अद्यापही चौकशी सुरूच असल्याचे उत्तर मिळत आहे.
विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊन दोन महिने उलटले, तरी चौकशी कासवगतीच्या कामकाजामुळे अद्यापही पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे याकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जात आहेत. या चौकशीला अद्याप दोन आठवड्यांचा अवधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
चौकशी समितीकडून घंटागाड्यांची जागेवर जाऊन माहिती घेतली जात आहे. त्यांची अवस्था, देखभाल दुरुस्ती याबाबी तपासल्या गेल्या आहेत. नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीनुसार घंटागाड्यांची चौकशी केली जात आहे. चौकशी समितीत यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, तसेच घनकचरा संचालक डॉ. कल्पना कुटे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
चौकशी कधी पूर्ण होणार याबाबत चौकशी समितीमधील सदस्य बोलण्यास तयार नसल्याने या चौकशीत नेमके काय दडलेय याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान महापालिकेची दोन महिन्यांनी प्रभारी आयुक्तांच्या पाठशिवणीच्या खेळातून सुटका होऊन डॉ. अशोक करंजकर नवे आयुक्त आले आहेत. यामुळे नवीन आयुक्त या चौकशीबाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.