नाशिक (Nashik) : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेतर्फे खरेदी केलेले बहुप्रतिक्षीत यांत्रिकी झाडूु येत्या दसऱ्याला सेवेत दाखल होणार आहेत. महासभेने २० ऑगस्ट २०२१ ला सहा विभागात ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदीचा निर्णय घेतला होता. यात पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचाही समावेश आहे. या झाडू खरेदीसाठी एप्रिल २०२३ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले. या झाडुच्या माध्यमातून शहरातील प्रतिदिन 160 किलोमीटरचे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत.
नाशिक महापालिकेकडे नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅमम अंतर्गत मार्च अखेरीस ८५ कोटी रुपये निधी अखर्चित असताना जवळपास ४१ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त झाला आहे. या निधीतून हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदवण्यासाठी केंद्र उभारणे, विद्युतदाहिनी बसविणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प, दुभाजकांमध्ये शोष वनस्पती, एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रूफ टॉप बसवणे आदी कामांचे नियोजन सुरू असताना महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू (रोड स्वीपर) खरेदी अंतिम टप्प्यात आहे.
नाशिक शहरात २१५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये, असे एकूण बारा कोटी ३६ लाख रुपये निव्वळ झाडू खरेदीसाठी खर्च होणार आहेत. त्यानंतर यांत्रिकी झाडू पुरवठादार कंपनीकडे पुढील पाच वर्षे यंत्र चालवणे, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ आदींची जबाबदारी असणार आहे. यासाठी महापालिका प्रत्येक महिन्याला ५ लाख ८५ हजार ७०० रुपये खर्च संबंधित पुरवठादारास देणार आहे. यासाठी पाच वर्षांत महापालिकेचे २१ कोटी ८ लाख रुपये खर्च होणार आहेत. एका यांत्रिकी झाडूच्या सहाय्याने एका दिवसात साडेतीन मीटर रुंदीच्या रस्त्यावर ४० किलोमीटरची स्वच्छता केली जाणार आहे. याप्रमाणे चार यांत्रिकी झाडूंच्या सहाय्याने प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. नाशिक शहरातील सर्व विभागात आउट सोर्सिंगच्या माध्यमातून रस्ते- झाडलोट होते. त्यासाठी तीन वर्षासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात येतात. त्यामुळे यांत्रिकी झाडू प्रत्यक्ष आल्यानंतर महापालिकेचा खर्च वाचणार आहे.
आउटसोर्सिंग ठेक्याचे काय?
शहरात चार यांत्रिकी झाडू दाखल होणार असल्याने दिवसाला १६० किलोमीटर रस्त्याची स्वच्छता होणार आहे. दुसरीकडे महापालिका शहर स्वच्छतेसाठी ठेका देउन ७५ कोटींचा खर्च करत आहे. मात्र आता या झाडुमुळे स्वच्छतेचे काम जलद होणार तर शिवाय शहर स्वच्छतेसाठी केल्या जाणाऱ्या खर्चाची बचत होऊ शकणार आहे. शहर स्वच्छतेसाठी सध्या आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून सातशे स्वच्छता कर्मचारी काम करतात. आउटसोर्सिगचा ठेका संपुष्टात आला असून त्याला ३१ ऑक्टोंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे या ठेक्याला मुदतवाढ देणार की तो ठेका रद्द होणार हे स्पष्ट होणार आहे.