

नाशिक (Nashik): नाशिक शहरातील पार्किंगची गंभीर समस्या सोडवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने (NMC) रविवार करंजा येथील यशवंत मंडईच्या (Yashvant Mandai) जागी प्रस्तावित बहुमजली वाहनतळ (Multilevel Parking) प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पासाठी मागील महिन्यात मागवलेल्या टेंडरला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा टेंडर प्रसिद्ध केले आहे.
शिवसेनेच्या पदाधिका-यांनी हा बहुमजली वाहनतळ महापालिकेने स्वनिधीतून अथवा राज्य सरकारच्या मदतीने उभारावा अशी भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेचेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही खासगी तत्वावर वाहनतळाला विरोध दर्शवताना या वाहनतळाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, महापालिका प्रशासन हा वाहनतळ खासगीकरणातून उभारण्यावर ठाम असून पहिल्या टेंडरला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने आता दुसऱ्यांदा टेंडर प्रसिद्ध केले आहे.
नाशिक शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या रविवार कारंजा येथील यशवंत मंडईची जीर्ण झालेली इमारत पाडून नाशिक महापालिकेने त्या रिक्त जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे ३० कोटी रुपये खर्चाच्या या बहुमजली वाहनतळ प्रकल्पाची वैशिष्ट्ये म्हणजे तो पूर्णपणे खासगी-सरकारी भागीदारी (Public-Private Partnership - PPP) अंतर्गत डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर उभारला जाणार आहे. याचा अर्थ निवडलेल्या खासगी कंपनीला प्रकल्पाची रचना, बांधकाम, निधी उभारणी, ३० वर्षे चालवणे आणि नंतर तो महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे, अशी संपूर्ण जबाबदारी असणार आहे.
रविवार करंजा हे शहराचे प्रमुख व्यावसायिक केंद्र असून मुख्य रस्ता, एमजी रोड, शालीमार, कापड मार्केट, सराफ बाजार अशी महत्त्वाची बाजारपेठ या परिसरात आहे. दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा असते, त्यामुळे रस्त्यावरच बेशिस्त पार्किंगमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. या टेंडर प्रसिद्धीनंतर मंगळवारी (९ डिसेंबर) प्रिबीड (टेंडरपूर्व) बैठक होणार आहे, तर टेंडरमध्ये सहभागी होण्याची शेवटची मुदत १२ डिसेंबर आहे.
महापालिका प्रशासनाने डिसेंबरअखेर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून जानेवारीत कामाला सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठा दिलासा मिळेल.
नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने (NMSCDCL) पंचवटीत सिता गुंफा आणि यशवंत मंडई परिसरात यांत्रिक पार्किंग प्रकल्प प्रस्तावित केले होते. त्या प्रकल्पांच्या टेंडर प्रक्रियेला मिळालेला अपुरा प्रतिसाद व इतर तांत्रिक कारणांमुळे ते पार्किंग प्रकल्प रखडले होते. आता महापालिकेने स्वतः पुढाकार घेऊन पारंपरिक बहुमजली पार्किंगचा निर्णय घेतला आहे.
शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना वाहनतळांची सुविधा अत्यल्प आहे. त्यामुळे रविवार करंजा येथील नवीन बहुमजली वाहनतळ प्रकल्प पूर्ण झाल्यास मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंगचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होईल.