

नाशिक (Nashik): मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे प्रवास अधिक वेगवान व सुलभ झाला आहे. मात्र, त्याचा लाभ केवळ खासगी वाहनधारकांनाच घेता येतो. सार्वजनिक प्रवासी वाहतूक विशेषत: राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून (MSRTC Bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या महामार्गावरून जाण्याचा अनुभव घेता येत नाही. ही बाब हेरून नाशिक परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावरून नाशिकहून मुंबई (वरळी) व नाशिकहून छत्रपती संभाजीनगर ही इलेक्ट्रिक बससेवा (EV Bus) सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समृद्धी महामार्गावरून टोल माफी देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना या मार्गावरून कोणताही अतिरिक्त भुर्दंड सोसावा न लागता वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येत आहे.
नाशिक विभागांतर्गत नाशिक बोरिवली जाणाऱ्या ११ व येणाऱ्या ११ बस, तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या २ व येणाऱ्या २ इलेक्ट्रिक वातानुकुलीत बससेवेचा प्रारंभ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गिते उपस्थित होते.
परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागांतर्गत आता नाशिक-बोरिवली व नाशिक-छत्रपती संभाजीनगरसह नाशिक-शिवाजीनगर, नाशिक-त्र्यंबकेश्वर, नाशिक-शिर्डी, नाशिक-सटाणा, नाशिक-नंदूरबार, नाशिक-कसारा विभागामार्फत सध्या ६५ इलेक्ट्रिक बस धावत आहेत.
मोठ्या प्रमाणात वेळेची बचत
नाशिक ते बोरिवली आणि नाशिक ते छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर धावणाऱ्या नव्या शिवाई बस सेवेमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीय प्रमाणात कमी झाला असून, टोलमाफीमुळे प्रवाशांना स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे.
पूर्वीच्या मार्गांपेक्षा या नव्या मार्गांमुळे प्रवास वेगवान झाला आहे. उदाहरणार्थ, नाशिक ते बोरिवली हा मार्ग पूर्वी ९ तास घ्यायचा, तो आता फक्त ७ तास ४५ मिनिटांमध्ये पूर्ण होत आहे. याशिवाय, ठाणे जवळील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी टाळल्याने वेळेची आणखी बचत होत आहे.
नाशिक ते छत्रपती संभाजीनगर या १७९ किलोमीटरच्या मार्गावर बस ११६ किलोमीटर समृद्धी महामार्गावरून धावते. या मार्गावरील प्रवास पूर्वी ५ तास १५ मिनिटांचा असायचा, तो आता फक्त ४ तासांमध्ये पूर्ण होत आहे.
समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या या बस सेवेमुळे सरासरी ६० ते ९० मिनिटांची वेळ बचत होत आहे. पडघा ते इगतपुरी या भागातून जाणाऱ्या या मार्गाने प्रवाशांना २१व्या शतकातील इलेक्ट्रिक बसचा अनुभव मिळत आहे.
असे आहे वेळापत्रक
१) नाशिक ते छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर ते नाशिक – बसची वेळ सकाळी ६ व सायंकाळी ६ या बससाठी पूर्ण तिकीट ५०९ रुपये, अर्धे तिकीट २५५ रुपये व महिला तिकीट २६६ रुपये असे दर आहेत.
२) नाशिक ते बोरिवली - बसची वेळ ६, ७, ८, ९, ९, १२.३०, १.३०, २.३०, ३.३०, ४.३०, ५.३० असून बससाठी पूर्ण तिकीट ५०९ रुपये, अर्धे तिकीट २५५ रुपये व महिला तिकीट २६६ रुपये असे दर आहेत.
३) बोरिवली ते नाशिक - बसची वेळ सकाळी ५, ७, ८, ९, १०,११, १२.३०, १.३०, २.३०, ३.३०, ५.३० अशी आहे. बससाठी पूर्ण तिकीट ५०९ रुपये, अर्धे तिकीट २५५ रुपये व महिला तिकीट २६६ रुपये असे दर आहेत.