
नाशिक (Nashik) : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू केली असून अभियंत्यांच्या पथकाने नुकताच वाराणसी व प्रयागराज दौरा करून त्या धर्तीवर नाशिकमध्ये सुविधा उभारल्या जाणार आहेत. तेथील कुंभमेळाप्रमाणे नाशिक येथेही मलनिस्सारण व्यवस्था, नदी स्वच्छता, घाट विकास, प्रदूषणमुक्त गोदावरी या कामांवर भर दिला जाणार आहे.
नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाराणसी व प्रयागराजचा १४ ते १६ एप्रिल तीन दिवसीय दौरा केला. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, यांत्रिकी विभागाचे अधीक्षिक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता गणेश मैंद, सचिन जाधव आदींचा पथकात समावेश होता. प्रयागराज -वाराणसी येथे २०२५ मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यानंतर दोन वर्षांनी २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. प्रयागराज-वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमधील गोदाघाटांचा विकास करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. 'नमामि गंगे' च्या धर्तीवर 'नमामि गोदा' प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यात घाट विकास, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण केले जाणार आहे.
'नमामि गंगे' प्रकल्पाच्या धर्तीवर नाशिकमध्ये 'नमामि गोदा' प्रकल्प राबवला जाणार आहे. यासाठी अभियंत्यांच्या पथकाने वाराणसीतील नमो घाट, मणकर्णिका घाट, राज घाट, हनुमान घाट, गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी मलवाहिका, मलनिस्सारण प्रकल्प, पंपिंग स्टेशनच्या यांत्रिकीकरणाची माहिती घेतली. नदी घाट विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण, गंगा मिशनअंतर्गत मलनिस्सारण योजना, पाच किलोमीटर लांबीचा नदीघाट विकास, रस्ते विकास, उड्डाणपूल, नदी घाटापर्यंतचे प्रमुख रस्ते यांचीही पाहणी केली.
गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मलनिस्सारण केंद्रात सांडपाण्याच्या हौदामध्ये विशिष्ट प्रकारच्या उगविण्यात आलेल्या वनस्पतींच्या माध्यमातून सांडपाणी वाहून नेले जाते. पाण्यातील प्रदूषित घटक वनस्पतीकडून शोषले जातात. देशात पाच बायो टॉवर आहे. यातील चार उत्तर प्रदेशमध्ये, तर एक कोलकता येथे आहे.
गॅबियन भिंत उभारणार
राष्ट्रीय हरित लवादाने नदी किनारी सिमेंट कॉक्रिटची भिंत बांधण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे वाराणसी येथे गॅबियन' तंत्रज्ञान वापरून भिंत बांधण्यात आली आहे. नाशिकमध्ये 'नमामि गोदा प्रकल्पांतर्गत गॅबियन तंत्रज्ञानावर आधारित नमो घाट विकसित करण्यात येणार आहे.