
मुंबई (Mumbai) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित परिसरात अर्थात 'नैना' क्षेत्रात सिडकोने सुमारे १२०० कोटींची विकासकामे हाती घेतली आहेत. याअंतर्गत रस्ते आणि मलवाहिन्यांची कामे केली जाणार आहेत. ठेकेदारांना येत्या ८ मेपर्यंत या कामांसाठी टेंडर सादर करायची आहेत. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण अडीच वर्षात ही कामे पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्धिष्ट आहे.
रायगड जिल्ह्यातील २५६ व ठाणे जिल्ह्यातील १४ अशा २७० गावांचे सुमारे ४६४ किमी क्षेत्र हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात 'नैना' क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे. मात्र, स्थापनेपासून परिसरात विकासकामे सुरु झालेली नाहीत. सिडको शेतकऱ्यांकडून जी जमीन घेणार आहे, त्यापैकी ६० टक्के जमीन स्वत:कडे ठेवून उर्वरित ४० टक्के विकसित भूखंड शेतकऱ्यांना देणार आहे. सिडकोच्या या धोरणास शेतकरी विरोध करीत आहेत. तसेच या भागात पायाभूत सुविधांची वनवा असल्याने विकासकांकडून सिडकोवर टीका होत आहे. रस्ते, गटारे, मलवाहिन्या नसतील शहर कसे विकसित करणार? असा सवाल त्यांच्याकडून करण्यात येत होता.
या पार्श्वभूमीवर नुकतेच राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने येथील विकासकामांना गती देण्यासाठी २२ महसूल अधिकारी, कर्मचारी यांची पदे मंजूर केली आहेत. त्यामुळे सिडकोने विकासकांच्या मागणीनुसार नैनातील रस्ते आणि मलवाहिन्यांची कामे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एकूण सात टप्प्यांत सुमारे १,२०० कोटींची विकासकामे करण्यात येणार आहेत.