

नाशिक (Nashik): आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये देशभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना आणि साधू-महंतांना दर्जेदार व स्वच्छ मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. सिंहस्थ काळात ५४ दिवसांच्या कालावधीसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात ५६ हजारांपेक्षा जास्त तात्पुरती स्वच्छतागृहे भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी सांभाळण्यासाठी प्राधिकरणाकडून अधिकृत टेंडर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यातील मुख्य पर्वण्यांचा म्हणजेच अमृतस्नानाचा काळ साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत असणार आहे. या कालावधीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे देशाच्या कानाकोपऱ्यांतून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. याशिवाय, लाखो साधू-महंतांच्या मुक्कामासाठी भव्य साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. या अथांग जनसागराची सोय लक्षात घेऊन सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने मोठी स्वच्छता मोहीम आखली आहे.
पर्वणीच्या काळात गोदावरी नदीच्या घाटांवर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांची, तसेच विविध वाहनतळ, तात्पुरती बसस्थानके, रेल्वे स्थानक आणि साधुग्राम या भागात मोठी गर्दी होत असते. ही गर्दी लक्षात घेता, संपूर्ण परिसरात स्वच्छता राखणे आणि रोगराई पसरू न देणे हे प्रशासनासमोरील मुख्य आव्हान असेल. यासाठी प्राधिकरणाने ५६,२१० तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
ठेकेदारांवर असणार संपूर्ण जबाबदारी
प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेनुसार, या सर्व प्रकारच्या स्वच्छतागृहांचा पुरवठा करणे, त्यांची योग्य ठिकाणी उभारणी करणे, ५४ दिवसांच्या कालावधीत त्यांचे पद्धतशीर संचालन करणे आणि संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी निवडल्या जाणाऱ्या एजन्सीवर किंवा संस्थेवर असणार आहे.
प्राधिकरणाने या कामासाठी अत्यंत तपशीलवार तांत्रिक निकष निश्चित केले आहेत. यामध्ये स्वच्छतागृहांची गुणवत्ता, मजबुती, नियमित साफसफाई, चोवीस तास पाणीपुरवठा, वीज व प्रकाश व्यवस्था आणि आवश्यक तिथे सेप्टिक टँकची सुविधा पुरवणे या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच कुंभमेळ्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न आहे.
अशी असणार संख्या
टॉयलेट (सेप्टिक टॅंकसह)- ३७००
टॉयलेट (सेप्टिक टॅंकशिवाय)- ८७३०
प्री-फॅब स्टील टॉयलेट (सेप्टिकटॅंकसह) -५६१५
प्री-फॅब स्टील टॉयलेट (सेप्टिकटॅंकशिवाय) -१३०९५
सिमेंटेड टॉयलेट -२२२०
व्हीआयपी टॉयलेट-३००
मोबाईल टॉयलेट- ५०
टिन टॉयलेट-१३५००
युरिनल्स-९०००
Key Points Summary
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून ५६,२१० तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यासाठी टेंडर प्रसिद्ध.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील मुख्य पर्वणीच्या काळात ५४ दिवसांसाठी ही स्वच्छतागृहे कार्यरत राहणार.
साधुग्राम, घाट परिसर, पार्किंग, बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छतागृहांचे जाळे निर्माण करणार.
यामध्ये ३०० व्हीआयपी टॉयलेट्स, ५० मोबाईल टॉयलेट्स आणि ९,००० युरिनल्सचा समावेश.
स्वच्छतागृहांची उभारणी, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था आणि दैनंदिन साफसफाईची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदार संस्थेची असेल.
सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्राधिकरणाकडून तांत्रिक निकषांचे काटेकोर नियोजन.