Kumbh Mela Nashik 2027: IIT मुंबई तपासणार कुंभमेळ्यातील कामांची गुणवत्ता

नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण बाह्ययंत्रणेद्वारे विषय तज्ज्ञ, सल्लागार यांची नेमणूक करणार
IIT Mumbai
IIT MumbaiTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक त्रंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने बाह्ययंत्रणेद्वारे विषय तज्ज्ञ, सल्लागार यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने गुणवत्ता नियंत्रण सल्लागार, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, विधी सल्लागार यांची नेमणूक केली जाणार आहे. त्याचप्रमाणे आयआयटी मुंबई यांचीही त्रयस्थ गुणवत्ता तपासणी संस्था म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

IIT Mumbai
Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्यातील हजारो कोटींची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अस्तित्वात आल्यानंतर या प्राधिकरणामध्ये राज्य सरकारमधील वित्त, नियोजन, महसूल, नगरविकास आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले आहेत. मात्र,  प्राधिकरणाला सिंहस्थाच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन, कामांची गुणवत्ता व कायदेशीर सल्ल्यांसाठी तज्ज्ञांची गरज भासत आहे.

कुंभमेळा प्राधिकरण ही सेवा दोन वर्षांसाठी घेणार असून त्यासाठी साधारणपणे ४ कोटी ७४ लक्ष रुपये निधी लागणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणच्या बैठकीत नुकतीच या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळानिमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिल्या आहेत. त्यातील बहुतांश कामे नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ आदी अंमलबजावणी यंत्रणांकडून केली जात आहेत. या व्यतिरिक्तही अनेक कामे कुंभमेळा प्राधिकरणच्या नियंत्रणाखाली मंजूर करण्यात आली आहेत.

IIT Mumbai
Nashik: सिंहस्थासाठी लावणार ऑलिम्पिक दर्जाचे दिशादर्शक फलक

या कामांची अंमलबजावणी करताना प्राधिकरणाकडे गुणवत्ता नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन व विधी विषयक कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढलेले असून त्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामुळे राज्य शासनाने कुंभमेळा प्राधिकरणाला बाह्ययंत्रणेमार्फत अथवा थेट जाहिरातीद्वारे 'सल्लागार व विषय तज्ज्ञ' यांच्या सेवा घेण्याच्या दिलेल्या अधिकारानुसार सल्लागार व विषयतज्ज्ञ यांच्या तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त्या करण्यात निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुणवत्ता नियंत्रण सल्लागार म्हणूनसेवानिवृत्त अधिक्षक अभियंता यांना घेतले जाणार आहे.

तसेच सिंहस्थ कुंभमेळा काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे. याशिवाय या मोठ्या संख्येने सुरू असलेल्या कामांमुळे अनेक कायदेशीर समस्या निर्माण होत आहे. यामुळे प्राधिकरणाने कायदेशीर सल्लागार यांचीही दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.  

कुंभमेळा प्राधिकरण हजारो कोटींची कामे करणार असून त्या कामांची गुणवत्ता तपासणीसाठी सल्लागार संस्थेची आवश्यकता आहे. स्वतंत्र व नामांकित त्रयस्थ संस्थेतर्फे तपासणी झाल्यामुळे रस्ते पायाभूत सुविधांची गुणवत्ता उच्च दर्जाची राहील. कामकाजा दरम्यानच त्रुटी आढळून त्यावर तत्काळ उपाययोजना करता येईल, ज्यामुळे पुढील मोठे नुकसान टळेल. स्वतंत्र तपासणीमुळे सर्व कामकाजात पारदर्शकता येऊन संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित होईल. याशिवाय तांत्रिक लेखापरीक्षण अनिवार्य असल्याने नियमबद्धता राखली जाईल.

IIT Mumbai
द्वारका ते दत्तमंदिर 10 पदरी रस्ता 12 महिन्यांत अशक्य? 177 कोटींच्या टेंडरप्रकरणी कंत्राटदारांचे काय आहेत आक्षेप?

तपासणीमुळे कामांच्या प्रगतीवर प्रभावी नियंत्रण राहून कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, या हेतुने आयआयटी मुंबई या संस्थेची नियुक्ती करणार आहे. यासाठी आयआयटी मुंबई या संस्थेला ३.९० कोटी रुपये सल्लागार फी दिली जाणार आहे. या सल्लागारांच्या नियुक्त्यांमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांमध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी अनुभवी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.

कामे निर्धारित मानकांनुसार व वेळेत पूर्ण होण्यास मदत होऊन निकृष्ट कामे, दुरुस्ती खर्च व संभाव्य तांत्रिक त्रुटी टाळता येतील. विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधून कामकाज अधिक परिणामकारक, पारदर्शक व सुरक्षित होईल, असे प्राधिकरणाला वाटते.

Tendernama
www.tendernama.com