
नाशिक (Nashik) : गावाच्या हद्दीतील बंद होत असलेले शिवार रस्ते (गाडी मार्ग) व वहिवाटीने पडलेल्या पायवाटा खुल्या करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला आहे. त्यासाठी वेळ पडली तर पोलिस बळाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यामुळे आता पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुटुंबासमवेत शेतीचे विभाजन मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी क्षेत्र कमी होत चालले असून, शेतातून जाणारे मार्गही बंद करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते खुले करण्याकरिता अनेक दिवसांपासून प्रकरण प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत. या प्रकरणांचे स्थळ निरीक्षण करणे, मोजणी करणे तसेच सुनावणी घेणे बंधनकारक आहे. त्यातून रस्त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या संदर्भात योग्य कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी (ता. १८) एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, गावचे तलाठी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख व पोलिस निरीक्षक यांना कायदेशीर बाबींच्या सूचना दिल्या आहेत.
गावातील पायवाटा या गावच्या नकाशातून तुटक रेषेने दर्शविलेल्या आहेत. या पायवाटांची रुंदी सव्वाआठ (८.२५ फूट) असायला हवी. तसेच ग्रामीण गाडी मार्ग हा साडेसोळा ते २१ फुटांपर्यंत रुंद करण्याचे आदेश दिले आहेत. गावातील तलाठी व सरपंच यांनी प्रथमत: गावचे शिवार रस्ते व पायवाट यांचा शोध घ्यावा. त्यानंतर भोगवटधारकांसमवेत बैठक घेऊन त्यांची समजूत काढावी. तरीही त्यांनी ‘वाट अडविल्यास’ पोलिस बळाचा वापर करण्याची स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तरीही मार्ग मोकळा झाला नाही तर कायदेशीर मार्गाने पुढे जाण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या संदर्भातील कालबद्ध कार्यक्रमच त्यांनी आखून दिला आहे. त्यामुळे पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा होण्यास मदत झाली. दरम्यान, या संदर्भात शिवपाणंद रस्ते संघटनेने काही दिवसांपूर्वी ‘पेरू वाटप’ आंदोलन करत याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शेतरस्ते खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेळ पडली तर पोलिस बळाचा वापर
पाणंद रस्त्यांना ग्रामीण भाषेत शिवार रस्तेही म्हटले जाते. या रस्त्यांसह पायवाट, ग्रामीण गाडी मार्ग (पोटखराब) रस्ते खुले करण्यासाठी गावचे सरपंच, तलाठी, तहसीलदार, बीडीओ एकत्रितपणे बैठक घेतील. तरी मार्ग मोकळा न झाल्यास पोलिसांच्या सहकार्याने हा मार्ग खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कामकाजाचे टप्पे
- २० ते २४ डिसेंबर : पायवाट किंवा वहिवाट असलेल्या रस्त्यांची माहिती तलाठ्यांनी भुमी अभिलेख कार्यालयाच्या उपाधीक्षकांकडून मिळवावी
- २४ ते २६ डिसेंबर : गावातील सर्व मार्गांना भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करावी
- २७ ते ३१ डिसेंबर : बंद असलेल्या रस्त्यांच्या भोगवटाधारकांची यादी तयार करावी
- १ ते ५ जानेवारी २०२५ : भोगवटाधारक व सरपंच आदींच्या सहकार्याने रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी एकत्रितपणे बैठक घ्यावी
- ६ ते १५ जानेवारी : वरील प्रयत्न करूनही रस्ता खुला होत नसेल तर पोलिसांच्या सहायाने हा रस्ता सुरू करावा
- १५ ते ३१ जानेवारी : तरीही रस्ता खुला न झाल्यास न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ नुसार पुढील कार्यवाही करावी