Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी‘च्या चौथ्या टप्प्याचे सिव्हिल वर्क 100 टक्के; फेब्रुवारीत होणार खुला

Samruddhi Mahamargh
Samruddhi MahamarghTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्याच्या विकासाला गती देणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या महत्त्वाकांक्षी महामार्गाच्या इगतपुरी-आमने ७६ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे बांधकाम काम पूर्ण झाले आहे. आमने-वडपे या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या साडेचार किलोमीटर मार्गाचे कामही एमएसआरडीसीने पूर्ण केले आहे.

Samruddhi Mahamargh
Devendra Fadnavis : महाराष्ट्र पहिला होता, पहिला आहे अन् पहिलाच राहील! असे का म्हणाले फडणवीस?

सध्या महामार्गावर पेंटिंग करणे, वाहतुकीची चिन्हे लावणे, लेन कटिंग मार्किंग, क्रॅश बॅरियर उभारण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. कसारा घाटातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. नागपूर-मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाच्या उभारणीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांत नागपूर-इगतपुरी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. ७६ किलोमीटर लांबीच्या इगतपुरी-आमने (भिवंडी) या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पेंटिंग, सूचना फलक लावणे आदी कामे सुरू आहेत. हा टप्पा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. समृद्धीचा अखेरचा टप्पा विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता; मात्र आमने-वडपे टप्प्यात असलेल्या गोदामामुळे हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने ऑक्टोबरचा मुहूर्त हुकला होता.

Samruddhi Mahamargh
Mumbai : खारघर-तुर्भे जोड मार्गाच्या कामाला सुरुवात; 2100 कोटींचे बजेट

समृद्धी महामार्ग आमने येथे संपतो. त्यानंतर पुढे आमने येथून मुंबई-नाशिक महामार्गावर वडपे येथे जाण्यासाठी सुमारे साडेचार किलोमीटरचा रस्ता बांधणे आवश्यक होते; मात्र हा टप्पा एनएचएआयच्या मुंबई-दिल्ली कॉरिडॉरचा भाग असल्याने त्याला विलंब लागणार होता. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून आमनेपर्यंत आलेली वाहने पुढे कशी जाणार, असा प्रश्न होता. परिणामी एमएसआरडीसीने या साडेचार किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. समृद्धी महामार्गाचे आमनेपर्यंत काम पूर्ण झाले असून, आमने-वडपे या साडेचार किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे; मात्र मुंबई-दिल्ली कॉरिडॉरच्या कामामुळे एका ठिकाणी वाहतूक वळवावी लागणार आहे. तसे केल्यास समृद्धीवरून येणारी वाहने थेट आमने-वडपे या मार्गावरून मुंबई-नाशिक महामार्गावर पोहोचू शकणार असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी-आमने या पॅकेजमधील सिव्हिल वर्क पूर्ण झाले असून, चिन्हे, पेंटिंग, लेन कटिंग पट्टे मारणे, क्रॅश बॅरियर उभारणे, टोलनाका येथील कामे सुरू आहेत. आमने-वडपे या टप्प्यातही या कामे सुरू आहेत.

Samruddhi Mahamargh
Pune Metro : मेट्रो प्रशासनाच्या कारभाराला का वैतागले नागरिक?

नाशिक-भिवंडी दोन तासांत प्रवास
१) इगतपुरी-आमणे या चौथ्या टप्प्यात १६ पूल आणि पाच बोगदे आहेत. तसेच सुमारे ९०० मीटर लांबीचा पूल असून, ९० मीटर उंचीचा महाकाय पूल आहे.
२) कसारा घाट सेक्शनमध्ये देशातील सर्वात लांब बोगदा तयार केला असून, त्याची उंची १७.५ मीटर आणि रुंदी २२.५ मीटरची आहे. त्यामुळे सध्या कसारा घाट पार करण्यासाठी सुमारे पाऊण तास वेळ लागतो तो आठ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
३) सध्या नाशिक-ठाणे या मार्गावर प्रवास करण्यासाठी सुमारे पाच-सहा तास लागतात; मात्र समृद्धी मार्गाचा चौथा टप्पा सेवेत आल्यानंतर नाशिक-भिवंडी हा प्रवास केवळ दोन तासांत होऊ शकणार आहे.

टप्पे
- नागपूर-शिर्डी
- शिर्डी-भरविर खुर्द
- भरविर-इगतपुरी
- इगतपुरी-आमने (भिवंडी)

समृद्धी मार्गाच्या चौथ्या इगतपुरी-आमने या टप्प्याचे सिव्हिल वर्क शंभर टक्के पूर्ण झाले असून, सध्या महामार्गावर वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेली पेंटिंग, वाहतुकीची चिन्हे बनवण्याचे काम सुरू आहे. हे काम महिनाभरात पूर्ण करून फेब्रुवारीत हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
- अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com