
वाकड (Wakad) : कानठळ्या बसविणारा चोवीस तास कर्णकर्कश आवाज, हृदयाचे ठोके वाढवणारी धडधड, महाप्रलयाकारी भूकंप व्हावा तसा रात्रं-दिवस सुरू असलेला धरणीकंप, घरांना बसणारे प्रचंड हादरे, अक्षरशः धुळीने माखलेले घरे, घरातील भांड्यावर धुळीचा साचलेला मोठा थर, अनेकांना जडलेले श्वसन विकार, घरी ये-जा करण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर मारावा लागणारा वळसा. ही व्यथा आहे वाकडच्या भुजबळ वस्तीवरील रहिवाशांची.
गेल्या तीन वर्षांपासून मेट्रो प्रकल्पाचा असह्य त्रास रहिवासी सहन करत आहेत. मोठ्या यंत्रणांच्या आधारे सुरू असलेल्या कामाला ते अक्षरश: वैतागले आहेत. याच भागात एकीकडे आयटीचा झगमगाट तर दुसरीकडे मेट्रो प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे अस्वच्छ आणि ओंघळवाण्या प्रकाराचे दर्शन देखील सर्वांना घडत आहे. वारंवार मागण्या व उपाययोजनांबाबत पाठपुरावा करून किंवा जाब विचारूनही मेट्रो प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ हताश झाले आहेत.
हाय राईज पोकलेनची धडधड...
मोठ्या हाय राईज पोकलॅनच्या सहाय्याने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. त्याची असह्य धडधड सुरुच असते. बॅरिकेडस् लावून रस्ता अडवण्यात आल्याने डोळ्यासमोर घर दिसूनही घरी ये-जा करताना तब्बल अर्धा किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. या जागेत कचऱ्याचे साम्राज्य आहे. रस्ता ओलांडण्यास जागा नसल्याने ज्येष्ठांचे हाल होतात. रस्ता अरुंद झाला आहे. पदाचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथच नाहीत. रस्त्याला साईड भिंत नसल्याने पावसाळ्यात थेट घरात पाणी घुसते.
स्वतःच्याच घरी राहणे स्थानिक रहिवाशांना नकोसे झाले आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग... असेच म्हणण्याची वेळ भुजबळ वस्तीवासियांवर आली आहे. ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सावतामाळी मंदिरात दर्शनाला जाण्यावर बंधने आली आहेत.
मेट्रोकडून करण्यात आलेल्या गतिरोधकावर रिफ्लेक्टर नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागत आहे. या परिसरात स्थानिक ग्रामस्थांची सुमारे दीडशे घरे आणि चारशे ते पाचशे सदस्य वास्तव्यास आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अटलांटा, भामा पल यासारख्या अनेक मोठ्या सोसायट्यांतील सुमारे दोन हजार रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागतोय.
महामार्ग आणि रस्त्यासाठी भुजबळ कुटुंबीयांनी योगदान दिले. आता मेट्रो प्रकल्पासाठीही जमिनी दिल्या आहेत. एवढेच नाही; तर या प्रकल्पाचा सर्वाधिक त्रासही भुजबळ वस्तीवासियच सहन करत आहे. या सर्वांचा सहानुभूतिपूर्वक विचार करून भुजबळ चौकाप्रमाणे येथील प्रस्तावित मेट्रो स्थानकाचे भुजबळ चौक मेट्रो स्थानक असे नामकरण व्हावे, अशी स्थानिक रहिवाशांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा व पत्रव्यवहार करत आहोत.
- अतुल भुजबळ, स्थानिक ग्रामस्थ, भुजबळ वस्ती, वाकड