
मुंबई (Mumbai) : शीव-पनवेल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिडकोमार्फत नव्याने उभारल्या जाणाऱ्या खारघर-तुर्भे जोड मार्गाच्या कामाला खारघरमधून सुरुवात झाली आहे. खारघर-तुर्भे जोड मार्ग हा ५.४ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. या कामासाठी २ हजार १०० कोटी खर्च येणार आहे. हा प्रकल्प ३१ डिसेंबर २०२८ अखेरपर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
शीव-पनवेल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिडकोकडून उभारल्या जाणाऱ्या खारघर- तुर्भे जोड मार्गाचे उद्घाटन लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले होते. खारघरमध्ये हे काम सुरू झाले आहे. खारघरवरून तुर्भे आणि तुर्भेमार्गे खारघरमध्ये प्रवेश करताना सेंट्रल पार्ककडून तळोजा कारागृहकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जवळपास दीड किलोमीटर लांबीचा पूल उभारला जाणार आहे. पूल उभारणीसाठी गुरुद्वारासमोरील रस्त्यावर खोदकाम सुरू झाले आहे. सेंट्रल पार्कमधून खारघर कार्पोरेट पार्कमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग असणार आहे. सिडकोच्यावतीने तळोजा, पेंधर ते खारघर खाडीमार्गे रस्त्याचे काम सुरू केले आहे. तुर्भे-खारघर जोड मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर मुंबईवरून थेट तळोजा वसाहत आणि तळोजा एमआयडीसीत पोहोचता येणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये -
- तुर्भे-खारघर जोड मार्गाचा उगम जुईनगर रेल्वे स्थानकासमोर शीव - पनवेल महामार्गापासून होतो आणि खारघर येथील गुरुद्वारा तथा सेंट्रल पार्कच्या चौकापुढे अस्तित्वात असलेल्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यामध्ये हा मार्ग विलीन होणार आहे.
- मार्गिकेची एकूण लांबी ५.४९० किलोमीटर
- खारघर डोंगर फोडून निर्माण केल्या जाणाऱ्या भुयारी मार्गाची लांबी १.७६३ किलोमीटर
- जोड मार्गाची संकल्पना ४+४ पदरी आहे. दोन भुयारी मार्ग संकल्पित आहेत आणि प्रत्येक भुयारी मार्ग चारपदरी असणार आहे.
- भुयारी मार्गाचा वापर व्यावसायिक अवजड वाहनांना करता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.