‘तो’ सुप्रसिद्ध शिल्पकार साकारणार मालवण किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा; 20.95 कोटींचे टेंडर

Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम राज्य सरकारने सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. कंपनीला दिले आहे. कंपनीला २०.९५ कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला शिवरायांचा पुतळा ऑगस्ट महिन्यात कोसळला होता. त्यानंतर राज्यातील ढवळून राजकीय वातावरण निघाले होते. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारण्यात आला होता. मात्र २६ ऑगस्ट रोजी ३५ फुटांचा पुतळा कोसळला. यानंतर नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर प्रक्रिया सुरू केली.

राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याचे टेंडर प्रसिद्ध केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गार्नेट इंटिरियर्स आणि राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या दोन कंपन्यांनी पुतळ्याच्या कामासाठी टेंडर दाखल केले होते. गार्नेट इंटिरियर्स या कंपनीने २०.९० कोटींचे, तर राम सुतार यांच्या कंपनीने ३६.०५ कोटींचे टेंडर दाखल केले. इतर बोलीदारांच्या टेंडरची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला २०.९५ कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे.

टेंडरच्या अटींनुसार राम सुतार यांच्या कंपनीने इतर कंपन्यांपेक्षा अधिक दराने बोली लावली होती. पण नंतर वाटाघाटीमध्ये किंमत जुळवून घेण्याची तयारी दर्शविली आणि म्हणूनच त्यांच्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. हे काम त्यांना सहा महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. यासंदर्भात अनिल सुतार म्हणाले की, आमच्या कंपनीला काम मिळाले असून कास्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मिमी जाडीचा पुतळा बनविण्याचे काम आम्हाला मिळाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डोक्यापासून पायापर्यंत पुतळ्याची उंची ६० फूट इतकी असणार आहे, तर पुतळा पेलण्यासाठी ३ मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. टेंडरनुसार १०० वर्षे टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे, तर कंत्राटदार कंपनीला १० वर्षे पुतळ्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचीही अट घातली आहे. आधी ३ फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल, त्याला कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतले जाईल. आधीच्या पुतळ्याला कला संचालनालयाची मान्यता घेतली गेली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता. नव्या पुतळ्याचा प्रकल्प आराखड्याचे काम आयआयटी-मुंबई आणि अनुभवी कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे.

सुतार यांच्या कंपनीने यापूर्वी स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com