
मुंबई (Mumbai) : शीव कोळीवाडा व गुरुतेग बहादूर नगर येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठी दोन दिग्गज कंपन्यांमध्ये चुरस आहे. रुणवाल डेव्हलपर्स आणि कीस्टोन रिलेटर्स या दोन कंपन्यांनी यासाठी टेंडर भरले आहे.
गुरुतेग बहादूर नगर येथील सिंधी निर्वासितांच्या मोडकळीस आलेल्या २५ इमारती मुंबई महापालिकेने अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. त्यानंतर या इमारती रिकाम्या करण्यात आल्या. पण या इमारतींचा पुनर्विकास करणार कोण असा प्रश्न होता. याबाबत रहिवाशांनी राज्य सरकारला साकडे घातले होते. सरकारने म्हाडाच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. मुंबई मंडळाने सल्लागाराच्या माध्यमातून यासंबंधी अभ्यास केला. या अभ्यासाच्या अहवालानुसार मोतीलाल नगरच्या धर्तीवर खासगी विकासकाची नियुक्ती करून (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलमेंट एजन्सी) पुनर्विकास मार्गी लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मार्चमध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासंबंधीचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर मंडळाने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याआधीच विकासकाच्या नियुक्तीसाठी टेंडर प्रसिद्ध केले होते.
टेंडर प्रक्रिया सुरू असतानाच एका खासगी विकासकाने ती रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याची मागणी नसतानाही तो हाती घेण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करीत विकासकाने टेंडर प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली होती. विकासकाच्या या याचिकेवरील सुनावणीदरम्यान एप्रिलमध्ये न्यायालयाने या पुनर्विकासासंबंधी कोणतीही कार्यवाही न करण्याचे निर्देश म्हाडाला दिले होते. त्यामुळे टेंडर प्रक्रिया रखडली. नुकतीच न्यायालयाने विकासकाची याचिका फेटाळून लावत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे आणि या पुनर्विकासासाठीच्या टेंडर प्रक्रियेस सुरुवात केली. मंडळाने २६ नोव्हेंबरला टेंडर प्रक्रिया पुन्हा सुरु करून टेंडरला मुदतवाढ दिली. ही मुदत आता संपुष्टात आली असून दोन दिवसांपूर्वी त्यासाठीच्या टेक्निकल टेंडर खुले करण्यात आले आहे. रुणवाल डेव्हल्पर्स आणि कीस्टोन रिलेटर्स या दोन कंपन्यांनी टेंडर सादर केल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. लवकरच टेंडर अंतिम करून नव्या वर्षात पुनर्विकासाला सुरुवात करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.