

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती ६६ किलोमीटर लांबीचा परिक्रमा मार्गाच्या (बाह्य रिंगरोड) केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे उभारणार आहे.
या परिक्रमा मार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने भूसंपादनासाठी ३ हजार ६५९.४७ कोटी रुपये निधीस मान्यता दिली असून हा खर्च सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार ४२६२.२४ कोटी रुपये निधीतून या परिक्रमा मार्गाची उभारणी करणार आहे. हा परिक्रमा मार्ग महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळ यांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे.
एकंदरित सिंहस्थापूर्वी तब्बल ७ हजार ९२२.११ कोटी रुपये खर्चून परिक्रमा मार्ग उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणापेक्षा हा परिक्रमा मार्ग वेगळा राहणार असल्याने त्याची लांबी दहा किलोमीटरने वाढली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्थाशी संबंधित ५ हजार ६०० कोटींच्या कामांचे भूमीपूजन पार पडले. त्यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ परिक्रमा मार्गाची उभारणी महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता शासनाने प्रस्तावित रिंगरोडला मंजुरी देत निधीची उपलब्धता करून दिली आहे.
भूसंपादनासाठी ३ हजार ६५९.४७ कोटी रुपये सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रायलयाने यापूर्वीच नाशिक शहरा रस्ता उभारणीसाठी ४ हजार २६२.६४ कोटी रुपयांच्या निधीस देण्याची तयारी दर्शवली आहे.
यामुळे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून आता या परिक्रमा मार्गासाठी केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रायलयाकडून परवानगी मागितली जाईल. त्यांच्या मान्यतेनंतर केंद्र व राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार होऊन या सिंहस्थ परिक्रमा मार्गाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.
भविष्यात केंद्र व राज्य सरकार यांच्यात सांमजस्य करार होऊन त्यात या परिक्रमा मार्गावरून जाणा-या वाहनांवर टोल आकारण्याचा निर्णय झाल्यास, त्यालाही या शासन निर्णयात मान्यता दिली आहे. ही टोल आकरणी राज्य सरकारने केलेला भूसंपादनाचा खर्च व केंद्र सरकारने केलेला रस्ते बांधणीचा खर्च यांच्या प्रमाणात पथकराच्या माध्यमातून मिळणा-या उत्पन्नाची विभागणी करण्यासही या शासन निर्णयातून मान्यता दिला आहे.
विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे या परिक्रमा मार्गाला आठ दिवसांत मंजुरी देण्याची विनंती केली आहे.
भूसंपादनासाठी प्रशासन सज्ज
परिक्रमा मार्गाच्या उभारणीत भूसंपादन हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी आठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यात भूसंपादनासाठी पाच स्वतंत्र अधिकारी तसेच नाशिक, निफाड व दिंडोरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
असा असेल सिंहस्थ परिक्रमा मार्ग
डीआरडीओ जंक्शन - दिंडोरी रोड (ढकांबे शिवार)- राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ (पेठ) -गवळवाडी- गंगापूर रोड गोवर्धन- त्र्यंबक मार्ग बेळगाव ढगा -नाशिक-मुंबई महामार्ग विल्होळी (रा.म.क्र. ६०)- सिन्नर फाटा -आडगाव.