

मुंबई (Mumbai): जागतिक दर्जाच्या शहरांमध्ये असतात तसे आंतरराष्ट्रीय मानकांचे सुरक्षित आणि सुटसुटीत फुटपाथ आता मुंबईतही अवतरणार आहेत. मुंबई महापालिकेने शहराचा चेहरामोहरा बदलणारा १०० कोटींचा 'युनिव्हर्सल फुटपाथ प्रकल्प' जाहीर केला आहे.
दिव्यांगांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये हा एक मोठा आणि धोरणात्मक बदल ठरणार आहे. या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे.
नेहमीच्या डागडुजीच्या पलीकडे जाऊन मुंबई महापालिकेने आता 'युनिव्हर्सल फूटपाथ पॉलिसी' स्वीकारली आहे. यामागे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'वॉकॅबल सिटी' (चालण्यायोग्य शहर) बनवण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे. या अंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, १४ प्रमुख रस्त्यांवर १६.५५ किमी लांबीचे अखंड आणि सुरक्षित पादचारी मार्ग तयार केले जाणार आहेत.
आतापर्यंत कंत्राटदारांच्या सोयीनुसार बांधले जाणारे फुटपाथ इतिहासजमा होणार आहेत. या नव्या प्रकल्पानुसार, इंडियन रोड्स काँग्रेसच्या कडक मानकांचे पालन करणे बंधनकारक असेल.
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना चालताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी फुटपाथची उंची सरसकट ६ इंच ठेवली जाईल. वाहतूक कोंडी झाली की दुचाकीस्वार सर्रास फुटपाथवर गाड्या चढवतात. हे रोखण्यासाठी आता ठिकठिकाणी 'बोलार्ड्स' बसवले जातील. दृष्टीहीनांना सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी जागतिक दर्जाच्या 'टॅक्टाईल टाइल्स'चा वापर केला जाईल.
शहरात अनेक हाउसिंग सोसायट्यांनी आपल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी फुटपाथ तोडून किंवा तिथे सिमेंटचा उतार तयार करून पादचाऱ्यांचा रस्ता गिळंकृत केला आहे. या 'युनिव्हर्सल प्रकल्पामध्ये' अशा अतिक्रमणांवर थेट हातोडा पडणार आहे.
अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या सोसायट्यांच्या गेटसमोरील चुकीच्या उतारांवर केवळ कारवाईच होणार नाही, तर दंडात्मक बडगाही उगारला जाईल. फेरीवाले आणि पार्किंगमुक्त रस्ते हे या धोरणाचे मुख्य सूत्र आहे.
हा बदल केवळ दक्षिण मुंबईपुरता मर्यादित नसून उपनगरांनाही याचा फायदा मिळणार आहे. काळाघोडा, कुलाबा आणि रिगल सिनेमा परिसर हा 'पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप'द्वारे पादचाऱ्यांसाठी नंदनवन बनवले जाईल. येथे खास प्लाझा उभारले जातील, जिथे फक्त चालणाऱ्यांना प्रवेश असेल. पूर्व उपनगरातील ५ आणि पश्चिम उपनगरातील ५ अशा महत्त्वाच्या रस्त्यांचे सुशोभिकरण आणि रुंदीकरण केले जाईल.