

मुंबई (Mumbai): पनवेल महापालिकेच्या स्थापनेला लवकरच १० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, गेल्या नऊ वर्षांत स्वतःच्या हक्काची एकही शाळा नसलेल्या महापालिकेने आता आपल्या १० व्या वर्षात पदार्पण करताना शहराच्या शैक्षणिक नकाशावर स्वतःची नाममुद्रा उमटवण्याचा निर्णय घेतला आहे.
भाड्याच्या जागेतून किंवा जुन्या जिल्हा परिषदेच्या शाळांतून बाहेर पडून महापालिका आता तळोजा आणि कामोठे येथे तब्बल १२० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक, कॉर्पोरेट दर्जाची शिक्षण संकुले उभारणार आहे.
पनवेल हे वेगाने नागरीकरण होणारे शहर असले तरी, महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास तब्बल एक दशक वाट पाहावी लागली आहे. आजवर सिडको वसाहती आणि २९ गावे कार्यक्षेत्रात असूनही महापालिकेने एकाही शाळेची इमारत उभारली नव्हती.
ही उणीव भरून काढण्यासाठी आणि आगामी १० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने शिक्षणाची 'कात' टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
ही संकुले भविष्यातील 'स्मार्ट' पिढी घडवणारी केंद्रे असणार आहेत. तळोजा (सेक्टर ७) आणि कामोठे (सेक्टर १९) या गजबजलेल्या उपनगरांमध्ये ही भव्य संकुले उभी राहतील. सहा ते सात मजल्यांच्या या इमारती एखाद्या खाजगी इंटरनॅशनल स्कूललाही लाजवतील अशा असतील.
यामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान मिळणार नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लिफ्ट (उद्वाहक), हायटेक सायन्स लॅब्स, डिजिटल लायब्ररी आणि भव्य ऑडिटोरियमची सोय असेल.
शहराचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि महेशकुमार मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून, टेंडर प्रक्रियाही सुरू झाली आहे. शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक इमारतीत ३५ ते ४० वर्गखोल्या असतील आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र स्कूल बस पार्किंगची व्यवस्थाही असेल.
एकीकडे रायगड जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, दुसरीकडे महापालिकेने स्वतःच्या मालकीच्या या वास्तू उभारून शिक्षणाबाबत आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नाही, तर शिस्त, नवोपक्रम आणि प्रगत तंत्रज्ञान मिळावे, हा या १२० कोटींच्या गुंतवणुकीमागचा मुख्य उद्देश आहे. पनवेलकरांसाठी हे प्रकल्प म्हणजे महापालिकेच्या दशकपूर्तीची सर्वात मौल्यवान भेट ठरणार आहेत.