

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य व केंद्र सरकार यांच्या निधीतून कुंभमेळा प्राधिकरणने नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी २५ हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे.
या आराखड्यानुसार नाशिक सिंहस्थ परिक्रमा मार्ग (रिंग रोड), घोटी ते अंबोलीघाट महामार्ग, नाशिक-पेठ महामार्ग रुंदीकरण, गोदावरी काठावर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे घाट बांधणी, ओढा, सुकेणे, खेरवाडी, देवळाली रेल्वे स्थानक सक्षमीकरण करणे, साधुग्राम उभारणे, त्र्यंबकेश्वर दर्शनपथ, त्र्यंबकेश्वर बाह्यवळण रस्ता आदी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे.
या प्रकल्पांसाठी ६५० हेक्टर जमिनीचे भूसंपादनाची गरज आहे. या प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरू असून सिंहस्थ कुंभमेळा अवघा दीड वर्षावर येऊन ठेपला आहे. यामुळे या ६५० हेक्टरचे भूसंपादन करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. भूसंपादनासाठी लागणारा प्रशासकीय वेळ विचारात घेता, ही भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एप्रील उजाडणार असल्याचा अंदाज आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनाचा आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृतस्नान पर्वणी ऑगस्ट व सप्टेंबर २०२७ मध्ये असून त्यापूर्वी म्हणजे जून २०२७ पूर्वी प्रस्तावित केलेली कामे पूर्ण होणे गरजेचे आहे.
आता त्यासाठी अवघे दीडवर्ष उरले असताना भूसंपादन प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. भूसंपादनासाठी विभागानुसार काही प्रकरणांत ३० दिवस तर काही प्रकरणात ६० दिवस प्रतीक्षा कालावधी असतो. यात प्रशासकीय कामकाजाचे दिवस मिळवल्यास कुठल्याही भूसंपादनास किमान ९० दिवस लागतात. सध्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित भूसंपादन प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यात आहे. अद्याप एकाही प्रकल्पासाठी भूसंपादन झालेले नाही.
आता जानेवारीपासून भूसंपादनास सुरुवात होईल, असे मानल्यास व लोकांनी जमिनी देण्याची तयारी दर्शवल्यास फेब्रुवारी, मार्चमध्ये काही भूसंपादन होईल. कोणताही अडसर न आल्यास ही प्रक्रिया एप्रिलच्या उत्तरार्धात पूर्णत्वास येऊ शकते. त्यानंतर त्या जागेवर प्रकल्प उभारण्यास सुरुवात होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.
डॉ. प्रवीण गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही गतिमान पूर्ण करीत पायाभूत सोयी सुविधांसह विकास कामांना गती द्यावी. असे निर्देश दिले. त्यासाठी संबंधित जमीन मालकांशी संवाद साधावा. त्यांना भूसंपादन प्रक्रिया आणि मोबदला याविषयी सविस्तर माहिती द्यावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आणि पुढील टप्प्यात करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कुंभमेळ्यासाठी नवीन घाट, रस्ता तयार करणे आदी विविध कामांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे नमूद केले.