ऐकावे ते नवल! 18 वर्षापूर्वी दिलेल्या जमिनी पडून असताना आता नवीन..

MIDC
MIDCTendernama

नाशिक (Nashik) : सिन्नर (Sinnar) तालुक्यातील इंडियाबुल्स सेझ प्रकल्पासाठी अठरा वर्षापूर्वी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या जमिनीवर अद्याप एकही उद्योग सुरू झालेला नसताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून नवीन १२७ हेक्टर जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून आधी अधिग्रहित केलेल्या जमिनींवर उद्योग आणा, नंतर नवीन जमिनींना नोटीसा पाठवा. सरकारला या जागेवर उद्योग सुरू करता येत नसतील, तर त्या जमिनी आमच्याकडे द्या, आम्ही त्यावर उद्योग सुरू करतो, अशा शब्दात शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांना सुनावले आहे.

MIDC
EXCLUSIVE: शिंदेंच्या ठाण्यातच अनधिकृत बांधकामांना 200 ₹ Sq.Ft.रेट

अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्यात औद्योगिक विकासासाठी सिन्नरजवळील गुळवंच व मुसळगाव येथे २००६ मध्ये 'सेझ' निर्मितीचा निर्णय झाला. शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गुळवंच आणि मुसळगावच्या शिवारात सुमारे १४०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांकडून खरेदी केले. मात्र, गेल्या १८ वर्षांपासून जमीन पडीक आहे. त्याठिकाणी कोणतेही मोठे उद्योग उभे न राहिल्याने सेझच्या मुसळगावच्या ८९ शेतकऱ्यांकडून ४१८.०२ हेक्टर व गुळवंचच्या १९८ शेतकऱ्यांकडून ९७६.१५ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीने संपादित केले. मुसळगावच्या शेतकऱ्यांना १८ वर्षांपूर्वी १७ कोटी पाच लाख रुपये, तर गुळवंच येथील शेतकऱ्यांना ४२ कोटी १४ लाख असा ६० कोटी रुपयांचा मोबदला दिला. शासनाने १४०० हेक्टरपैकी एमआयडीसीच्या माध्यमातून औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी ९०० हेक्टर जमीन भाडेतत्वावर दिली आहे.

MIDC
DCM: 'त्या' 5000 पोलिसांच्या पैशांचे काय झाले? काय म्हणाले फडणवीस?

सध्या या सेझमधील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प बंद असून तेथे इतर कोणतेही प्रकल्प सुरू नाहीत. त्याचप्रमाणे या जमिनीपैकी १५ टक्के विकसित भूखंड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, या सेझमध्येच उद्योग नसल्यामुळे हे विकसित भूखंड तसेच पडून आहेत. त्याचवेळी सेझ प्रकल्पासाठी अधिसूचित केलेले परंतु अद्याप अधिग्रहित न झालेल्या १२७ हेक्टर क्षेत्राच अधिग्रहण करण्यासाठी महसूल विभागाकडून गुळवंच, मुसळगावच्या ११ शेतकऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटीसांना शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. यामुळे प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी गट क्रमांकनिहाय शेतकऱ्यांचे म्हणणे नोंद करून घेतले. रामनाथ शिरसाठ, तुकाराम शिरसाठ, विशाल शिरसाठ, नवनाथ शिरसाठ, गोरख शिरसाठ, कांचन शिरसाठ, भीमा सानप, भगवान सानप, लहानू सानप, रतन सानप, निवृत्ती सांगळे, नामदेव सांगळे, सुखदेव सांगळे, अंकुश सांगळे आदी शेतकरी उपस्थित होते.

MIDC
Nashik: E-Charging स्टेशन्ससाठी महापालिकेने का काढले फेरटेंडर?

इंडियाबुल्सच्या सेझसाठी दिलेले आधीचे क्षेत्र तसेच पडून आहे. पुन्हा उर्वरित क्षेत्र अधिग्रहण करून काय साधायचे आहे. उद्योगांसाठी जमिनी घेतल्या जात असतील तर आम्हीच उद्योग टाकतो, असे काही तरुण शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. उर्वरित क्षेत्र अधिग्रहितसाठी नोटिसा प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एक इंचही जागा देणार नसल्याचे प्रांत हेमांगी पाटील यांना स्पष्ट शब्दात सुनावले. वारंवार नोटिसा पाठवून त्रास देऊ नका, अशीही विनवणी शेतकऱ्यांनी केली. या उर्वरित जमिनींच्या अधिग्रहणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com