Nashik : सरकारी रुग्णालयांमधील आहार पुरवठा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न

Mid Day Meal
Mid Day MealTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्रातील सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल रुग्णांना आहार पुरवणारा ठेकेदार व आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी यांनी संगनमताने बनावट रुग्णसंख्या दाखवून घोटाळा केला असल्याचे चौकशीत समोर येऊनही ही चौकशी दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आहार पुरवल्याबद्दल १३ कोटींची देयके देण्यात आली असून तक्रारदारांनी तीन वर्षांच्या आहार पुरवठ्याची चौकशी करण्याची मागणी करूनही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने ठराविक ग्रामीण रुग्णालयांमधील केवळ एकाच महिन्याच्या कागदपत्रांची चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून ७५ हजार रुपयांची वसुली करण्याचा अहवाल दिला आहे. या चौकशी अहवालात दर्शवण्यात आलेली रुग्णसंख्या व प्रत्यक्ष माहिती अधिकारातून आलेली रुग्णसंख्या यांतील तफावत मोठी असल्यामुळे हा कोट्यवधींचा घोटाळा असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

Mid Day Meal
Mumbai Costal Road News : नरिमन पॉईंट ते वरळी सी लिंक सुसाट; दुसऱ्या महाकाय गर्डरच्या लॉंचिंगचा मुहूर्त ठरला

राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने ७ मार्च २०१९ रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल रुग्णांना आहार पुवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने टेंडर राबवून श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्थेला कार्यारंभ आदेश दिले होते. या टेंडरची मुदत २०२२ पर्यंत होती. या काळात जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, विभागीय संदर्भ रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल रुग्णांना या संस्थेकडून आहार पुरवण्यात आला. त्यापोटी आरोग्य संचालनालयाच्या नाशिक या कार्यालयातून एकूण १५ कोटी २८ लाख रुपयांची देयके देण्यात आली. त्यात विभागीय संदर्भ रुग्णालयातून २ कोटी २० लाख रुपयांच्या देयकांचा समावेश आहे. रुग्णांना आहार पुरवून त्याबदल्यात देण्यात आलेली रक्कम मोठी असल्याचा संशय आल्याने माधव सेना या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या आहार पुरवठा टेंडरची चौकशी करण्याची मागणी २० जानेवारी २०२३ ला केली. या तक्रारीची दखल घेऊन आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी या तक्रारीनुसार चौकशी करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिल्या. त्यांनी प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. डी. पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. डॉ. व्ही. डी. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व सरकारी रग्णालयांमधील आहार पुरवठ्याची चौकशी न करता केवळ कळवण, गिरणारे (नाशिक) दोडी बुद्रूक (सिन्नर), उमराणे (देवळा), इगतपुरी  या पाच रुग्णालयांमधील केवळ एप्रिल २०२२ या एकाच महिन्यातील आहार पुरवठ्याची पडताळणी केली. या पडताळणीनुसार संबंधित पुरवठादारांने पुरवलेल्या आहारापेक्षा ७५ हजार १८३ रुपयांची अधिक रकमेची देयके काढली असल्याचे आढळून आले.

Mid Day Meal
Nashik : राजकीय कुरघोडीमध्ये आयटी पार्कचे झाले खेळणे; जागा बदलाचा तीनदा खेळ

डॉ. व्ही. डी. पाटील यांनी या चौकशीचा अहवाल तयार करून तो जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांना २९ डिसेंबर २०२३ रोजी सादर केला आहे. या अहवालामध्ये संबंधित ठेकेदाराला ७५ हजार १८३ रुपये रक्कम अधिक दिली असल्याचे नमूद केले असून ठेकेदाराकडून ती रक्कम वसूल करण्याची शिफारस केली आहे. या चौकशीत प्रथम दर्शनी आहार पुरवठ्यात घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आल्यामुळे माधव सेनेच्या कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारातून दोडी बुद्रूक येथील ग्रामीण रुग्णालयातील एप्रिल २०२२ मधील दाखल रुग्ण व त्यांना पुरवण्यात आलेला आहार याची माहिती मागवली. माहिती अधिकारातून प्राप्त माहितीनुसार एप्रिलमध्ये दोडी ग्रामीण रुग्णालयात केवळ ६१ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते व त्यांना आहार पुरवण्यात आला होता. प्रत्यक्षात ठेकेदाराला एप्रिलमध्ये १४४ रुग्णांना आहार दिल्याचे देयक देण्यात आले आहे व डॉ. व्ही. डी. पाटील यांनी केलेल्या चौकशीत त्यांनी एप्रिलमध्ये १४४ नाही, तर १२७ रग्ण होते. यामुळे उर्वरित १७ रुग्ण खोटे दाखवून दिलेल्या देयकांच्या रकमेची वसुली करावी, असे अहवालात नमूद केले आहे.  यामुळे डॉ. व्ही. डी. पाटील यांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोडी ग्रामीण रुग्णालयाती केवळ एप्रिल महिन्यातच खोटे ८३ रुग्ण दाखवून त्यांच्या नावाने आहार पुरवठ्याची वसुली केली असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. यामुळे या कार्यकर्त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा व सरकारवाडा पोलीस ठाण्यात  या अपहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी तक्रार अर्ज दिला आहे.  या कार्यकर्त्यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील ३१ सरकारी रुग्णालयांमध्ये २०१९ ते २०२२ या तीन वर्षांच्या काळातील देयकांची सखोल चौकशी केल्यास यात सहा कोटींचा घोटाळा असल्याचे उघडकीस येईल, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.  यामुळे या घोटाळ्याची चौकशी जिल्हा रुग्णालयातील अधिकारी यांच्याकडून करण्याऐवजी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Mid Day Meal
Nashik : 42 कोटींच्या वह्या खरेदीत पारदर्शकता नसल्याने टेंडर रद्द करावे; सचिवांना पत्र

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये आहार पुरवठा ठेकेदाराला दिलेल्या देयकांची चौकशी करण्याच्या तक्रारीनुसार आम्ही जिल्हा रुग्णालयास चौकशीचे आदेश दिले होते. त्यांचा चौकशी अहवालही आला आहे. याबाबत कोणाला काही तक्रार असल्यास त्यांनी पुन्हा अर्ज द्यावा, त्यानुसार चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत.

- डॉ. कपिल आहेर, जिल्हा उपसंचालक, आरोग्य विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com