
नाशिक (Nashik) : जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात पाइपलाइनच्या ८०० योजना पूर्ण झाल्या आहेत. यातील ७३३ योजनांमधून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, ४२२ योजनांची कामे अजूनही रखडली आहेत. त्यांना निधीच उपलब्ध होत नसल्याने ही कामे मार्चअखेर पूर्ण कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत जलजीवन योजनेच्या पूर्ण झालेल्या कामांचे १०० कोटी रुपये थकीत आहेत.
संबंधित विभागाने राज्य शासनाला पत्र पाठविले. त्याचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यातील एक हजार २९६ गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत एक हजार २२२ पाणीपुरवठा योजनांची एक हजार ४१० कोटींची कामे सुरू आहेत. यात ६८१ रेट्रोफिटिंग (जुन्या योजना) असून, नवीन योजना ५४१ आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ च्या मुदतीला सहा महिने मुदतवाढ मिळाली. आता या योजना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२५ चे आदेश आहेत. योजना पूर्ण करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र झालेल्या कामांची देयके रखडली आहेत. सहा महिन्यांपासून झालेल्या कामांची ठेकेदारांची बिले थकली आहेत. त्यामुळे कामांची गतीही मंदावली आहे. निधीअभावी मोठ्या योजनांची कामे संथगतीने सुरू आहेत. काही कामे ठप्प आहेत.
सहा महिन्यांपासून योजनांची केवळ ७० ते ८० कामे पूर्ण झाली आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये शासनाकडून केवळ १७ कोटी रुपये मिळाले होते. त्यानंतर शासनाकडून निधी मिळालेला नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी निधी वर्ग झाल्याने विभागाकडे निधीचा वनवा असल्याचे बोलले जात आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाले असून, पाणीपुरवठा विभागाला मंत्रीही मिळाले आहेत. त्यांच्याकडून निधीची अपेक्षा आहे.
''जलजीवन मिशन अंतर्गत योजनांची थकीत बिले मिळावी, यासाठी विभागाकडून शासनाला पत्र दिले आहे. बिले थकल्याने योजनांच्या कामांवर परिणाम होत आहे. वेळेत काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.''
- गंगाधर निवडंगे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग