Nashik : अखेर पाणीपुरवठा विभागाकडून रिटेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय, कारण...

Water pipeline
Water pipelineTendernama
Published on

नाशिक (Nashik) : शहरातील जुन्या व जीर्ण झालेल्या पाइपलाइन बदलण्याबरोबरच गांधीनगर व शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून मंजूर २८६ कोटी रुपयांचे काम मिळविण्यासाठी टेंडर प्रक्रियेत सहभागी होत असलेल्या कंपन्यांना टेंडर न भरण्यासाठी वापरण्यात आलेले दबावतंत्र व पात्र कंपन्यांकडून टेंडरमधील अटी व शर्तींची पुर्तता होत नसल्याने अखेरीस पाणीपुरवठा विभागाकडून रिटेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Water pipeline
Pune : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोंडी टाळण्यासाठी...

त्यामुळे दबावतंत्राला वैतागलेल्या अधिकारी वर्गाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. शहराची वाढती लोकसंख्या व आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण पडताना दिसत आहे. शहरात २३ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे, तर एक ते दीड लाख ये-जा (फ्लोटींग) करणारी लोकसंख्या आहे. कुंभमेळ्यात पर्वणीच्या कालावधीत दोन ते तीन कोटी भाविक येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे नवीन नगरामध्ये जलवाहिन्या टाकणे, जुन्या जलवाहिन्या बदलणे, जुन्या जलकुंभाची दुरुस्ती तसेच नवीन जलकुंभाची निर्मिती करण्यासाठी महापालिकेने शासनाला अमृत दोन योजनेतून प्रस्ताव दिला होता. त्यानुसार २८६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. विधानसभेची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एकूण सात कंपन्यांनी तयारी दर्शविली. परंतु काही अज्ञात व्यक्तींकडून दबावतंत्राचा वापर करण्यात आला.

Water pipeline
Nashik ZP : जिल्हा परिषदेचे उपकरांच्या रुपात पालिकांकडे पाच कोटी थकीत

अखेरीस दोन कंपन्यांनी टेंडर प्रक्रियेत सहभाग नोंदविला. अधिकाऱ्यांवर वाढत्या दबावामुळे २८६ कोटींची योजना वादात सापडली. मात्र महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवर अधिकारी बदलल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडत दबावतंत्र झुगारल्याने आता नव्याने रिटेंडर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन-तीन दिवसात नवीन अटी व शर्तींचा समावेश असलेली निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

दर बदलल्याने वाद

शहरातील पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने मंजुरी केलेली योजनेचे २८६ कोटींचे काम मिळविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निश्‍चित केलेले दर बदलण्यात आले. सदर बाब उघड झाल्यानंतर विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करण्याचा इशारा आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी दिले. त्यानंतर दर पृथीकरणासाठी टेंडरमध्ये दहा दिवसांची मुदतवाढ दिली गेली. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर निविदा प्रक्रियेत सहभागी होवू नये यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याने टेंडर प्रक्रिया वादात सापडली. पाणीपुरवठा विभागाने या वादातून मार्ग काढताना रिटेंडर राबविण्याचा निर्णय घेतला.

अशी आहे योजना

- नवनगरांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकणे

- शहरातील जुन्या व जीर्ण जलवाहिन्या बदलणे

- शिवाजीनगर, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण

- चेहडी पंपिंग ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य वितरण वाहिनी बदलणार

- कार्बन नाका ते रामालय जलकुंभापर्यंत ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकणे

- लव्हाटेनगर जलकुंभातून २४ तास पाणीपुरवठा योजना.

- शिवाजी नगर, बाराबंगला, गांधीनगर जलकुंभाच्या पीएससी जलवाहिनी बदलणे

- पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र ते शक्तीनगरपर्यंत ६०० मिमी व्यासाची नवीन जलवाहिनी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com