
पुणे (Pune) : पुणे शहराच्या अनेक भागांत सध्या एक ते दीड तास पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणी कमी पडते. नागरिकांकडून महापालिकेकडे टँकरची मागणी केल्यानंतर त्यांना बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एखादा टँकर मिळतो.
हे पाणी पुरसे नसल्याने प्रतिटँकर एक हजार ते दोन हजार रुपये मोजून खासगी टँकरचालकांकडून पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेकडून मोफत टँकर मिळतो? तो मागवायचा असेल तर कोणाकडे मागणी करायची? याची माहिती नागरिकांना नाही. (water shortage in pune)
वडगावशेरी, नगर रस्ता, खराडी, विमाननगर यासह अन्य भागांना भामा आसखेड धरणातून मुबलक पाणीपुरवठा केला जातो. मात्र येथील पाणी पुरवण्याची यंत्रणा टँकरमाफियांच्या दबावाला बळी पडत असून, अनेक सोसायट्यांना कमी पाणी देऊन महागडे टँकरचे पाणी विकत घेण्यास भाग पाडले जात आहे.
सोसायट्यांचे पाणी कमी केल्यानंतर टँकरचालकांकडून टँकर पाहिजे का? अशी चौकशी सोसायट्यांकडे स्वतःहून केली जात आहे.
मार्च महिन्यातील टँकरची मागणी (महापालिका)
- पर्वती - १,३३८
- धायरी - २,४१३
- पद्मावती - १२,९२४
- पटवर्धनबाग - ७६३
- चतुःशृंगी - ७,७३८
- रामटेकडी - १५,७२४
- वडगावशेरी - ६,५११
वर्षभरातील टँकरची मागणी (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५)
एप्रिल २०२४ - ४१६०३
मे - ४३१८९
जून - ४०७३२
जुलै - ४२२२०
ऑगस्ट - ४१११९
सप्टेंबर - ३९११२
ऑक्टोबर - ४०६१९
नोव्हेंबर - ३६९४१
डिसेंबर - ३६५९१
जानेवारी २०२५ - ३९६९२
फेब्रुवारी - ३८५२२
मार्च - ४७८९६
जलकेंद्रावरून होणारे पाणीवाटप (आकडे ‘एमएलडी’त)
- वडगाव जलकेंद्र - २४०
- लष्कर - ४४६
- रामटेकडी - १२८
- भामा आसखेड - १४४
- रावेत बंधारा - २७
- वारजे - १०
- वारजे जुने जलकेंद्र - १२
- वारजे नवे जलकेंद्र - १४१
- पर्वती जलकेंद्र - १५०
उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पूर्ण दाबाने व पुरेसा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या शहरासाठी १६८५ ते १७१५ एमएलडी इतके पाणी लागत आहेत. पाण्याची तक्रार येते तेथे लगेच दुरुस्ती केली जाते. तसेच नागरिकांच्या मागणीप्रमाणे मोफत टँकर पुरविले जातात.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग