Contractors
ContractorsTendernama

...तर विकासकामे रोखणार! राज्यातील ठेकेदार फडणवीस सरकारवर का संतापले?

Published on

मुंबई (Mumbai) : संपूर्ण राज्यभरात 89 हजार कोटींची विकासकामे झाली असली तरी ठेकेदारांची (Contractors) बिले देताना सरकारने आखडता हात घेतला असून, केवळ चार हजार कोटींचा निधी त्यासाठी उपलब्ध करून दिल्याने ठेकेदारांमध्ये संतापाची लाट आहे. संतप्त ठेकेदारांनी आता सरकारच्या विरोधात आक्रमक होत विरोधाचा शड्डू ठोकला आहे. (Contractors Angry On Maharashtra Government)

Contractors
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या टेस्टिंगचा मुहूर्त ठरला! जपान 'त्या' शिंकानसेन ट्रेन मोफत पुरवणार

राज्यात 89 हजार कोटींची विकासकामे झाली आहेत, पण ठेकेदारांची (Contractors) बिलांची रक्कम देण्याकरिता राज्य शासनाने केवळ 4 हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ठेकेदारांची थकीत बिले लवकरात लवकर दिली नाहीत तर विकासकामेच रोखून धरू, असा निर्वाणीचा इशारा राज्य कंत्राटदार महासंघ व अभियंता संघटनेने दिला.

ठाण्यात कंत्राटदार महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. त्यात ठेकेदारांवरील अन्यायाचा पाढा वाचण्यात आला. थकीत बिलांसाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील ठेकेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वारंवार मागणी करूनही फडणवीस सरकारने त्यांचे पैसे थकवल्याने कंत्राटदारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

Contractors
'महसूल'मध्ये बदलांचे वारे! येत्या 15 ऑगस्टपासून तुकडेबंदीसह कोणते कायदे, नियम बदलणार?

कोरोनाच्या महामारीत अनेक अडचणी येऊनदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ठेकेदारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना हिंमत दिली. तुम्ही विकासाची कामे सुरू ठेवा. बिले वेळेत मिळतील असे आश्वासनही दिले.

त्यानुसार त्यांनी सर्व ठेकेदारांची बिले वेळेमध्ये दिली असल्याची बाब कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी निदर्शनास आणली. ते म्हणाले, सध्याच्या फडणवीस सरकारचा अनुभव अतिशय वाईट असून आमची हक्काची रखडलेली हजारो कोटींची बिले दिली जात नाहीत. मात्र आता हा अन्याय आम्ही सहन करणार नाही.

ठेकेदारांना कामाच्या केवळ पाच टक्के रक्कमच मिळणार आहे. परिणामी ठेकेदारांनी जगायचे कसे असा प्रश्न आता निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. रखडलेली बिले दिली नाहीत तर विकासकामेच रोखून धरू, असा इशारा सरकारला देण्यात आला.

Contractors
Mumbai : खारघर-तुर्भे जोड मार्गाच्या कामाला सुरुवात; 2100 कोटींचे बजेट

ठेकेदारांची बिले देण्यासाठी फडणवीस सरकारकडे पैसे नसतील तर केंद्राकडून त्यासाठी कर्ज घेणे आवश्यक आहे. पण केंद्रदेखील या सरकारला खेळवत आहे. लवकरात लवकर बिले दिली नाहीत तर सरकारला कायदेशीर नोटीस बजावणार असून, वेळ पडल्यास न्यायालयाचे दरवाजेदेखील ठोठावू, असा इशारा कंत्राटदार महासंघाने दिला आहे.

यावेळी संजय मैड, राजेश देशमुख, अनिल पाटील, सुबोध सरोदे, सुरेश पाटील, प्रकाश पांडव, अनिल नलावडे, मंगेश आवळे यांच्यासह 29 जिह्यांतील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Tendernama
www.tendernama.com