
पुणे (Pune) : कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने पुणे शहराला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे शहरातील विकासकामांचा वेग वाढणार का याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
यानिमित्ताने भाजपने आगामी महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याचेच दिसत आहे. दरम्यान, यापूर्वी १९९५ मध्ये राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुण्याला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली होती.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिपदाच्या वाटपावरून राज्यात सुरू असलेला घोळ अखेर मिटला. मंत्रिमंडळात पुण्याला स्थान मिळणार का? कोणाची वर्णी लागणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सात जागांवर महायुतीला यश मिळाल्याने मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच माधुरी मिसाळ, सुनील कांबळे आणि सिद्धार्थ शिरोळे यांची नावे चर्चेत होती. अखेर पाटील आणि मिसाळ यांच्या नावांवर पक्षाने शिक्कामोर्तब केला आहे.
शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर १९९५ मध्ये शिवसेनेचे शशिकांत सुतार आणि भाजपचे दिलीप कांबळे यांच्या रूपाने पुणे शहराला दोन मंत्रिपदे मिळाली होती. २०१४ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर गिरीश बापट यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते, तर पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेल्या चंद्रकांत पाटील यांनाही संधी दिली होती.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उदयास आली. अडीच वर्षांत महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या महायुतीमध्ये चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद दिले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्याने पुण्यात दोन जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार आणि दत्ता भरणे यांना संधी मिळाली आहे.
नवीन वर्षात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. पुणे शहर व जिल्ह्याला मंत्रिमंडळात झुकते माप देऊन महायुतीने आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याचेच यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
माधुरी मिसाळ या चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये मंत्रिपदाच्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता. परंतु उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऐनवेळी त्यांच्याऐवजी मुंबई येथील विद्या ठाकूर यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला होता. त्यामुळे मिसाळ यांची संधी हुकली. तेव्हापासून मिसाळ यांचे नाव चर्चेत आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल होऊन महायुतीचे सरकार सत्तेत आले, तेव्हादेखील मिसाळ यांना राज्यमंत्रिपद मिळणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र त्यांना पुन्हा एकदा हुलकावणी मिळाली.
आता मात्र त्यांना राज्यमंत्री देऊन पक्षाने भरपाई केल्याची चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मिसाळ यांच्या रूपाने पर्वती विधानसभा मतदारसंघाला १९९५ नंतरच मंत्रिपद मिळाले आहे.
भाजपच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे यंदाही त्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते छातीठोकपणे सांगत होते. २०१९ च्या निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर महसूलसह सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार त्यांनी पाहिला होता. त्यामुळे यंदा त्यांना संधी मिळणार असल्याचे पक्के मानले जात असले, तरी खाते कोणते मिळणार, हाच चर्चेचा विषय होता.
पाटील आणि मिसाळ यांच्या रूपाने राज्यात दोन मंत्रिपदे, तर मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने केंद्रात राज्यमंत्रिपद असल्याने शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.