
पुणे (Pune) : शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्वीच्याच जागेवर होणार असून, सार्वजनिक आणि खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर त्याची उभारणी होईल. स्थानक उभारणीची जबाबदारी महामेट्रोची असेल आणि लवकरच त्याबाबत राज्य एसटी महामंडळ आणि महामेट्रोमध्ये करार होईल. पुढील तीन वर्षांत स्थानक उभारण्यात येणार आहे.
शिवाजीनगर एसटी स्थानकाची पूर्वीच्याच जागेवर उभारणी व्हावी, यासाठीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सर्किट हाउसमधील एका बैठकीत केली. त्यानंतर पवार यांनी राज्याचे वाहतूकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी लगेचच दूरध्वनीवरून चर्चा केली. त्या वेळी स्थानक उभारणीचे काम वेगाने सुरू करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. सरनाईक यांनी त्याबाबत सकारत्मकता दाखविली.
आता एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात करार होईल. त्यानंतर टेंडर मागविण्यात येईल आणि स्थानक उभारणीची प्रक्रिया सुरू होईल. स्थानकाच्या आराखड्यात पीएमपीच्या बस, कॅब आदींसाठीही जागा असेल. त्यामुळे प्रवाशांना एकाच ठिकणी वाहतुकीच्या एकात्मिक सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.