
भोसरी (Bhosari) : भोसरी, दिघीतील पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल - PMPML) काही ठिकाणी बस थांब्यांवर निवारा शेड नसल्याने तर काही ठिकाणच्या बसथांब्याची दुरवस्था झाली आहे.
परिणामी, प्रवाशांना उन्हात ताटकळत बसची वाट पहावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना त्याचा त्रास होत आहे. थांब्याच्या दुरुस्तीबरोबरच थांब्यावर निवारा शेड उभारण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
भोसरीतील लांडेवाडी चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगतच्या एका थांब्यावरील शेड गंजले आहे. बसण्यासाठी असलेली जाळीही तुटलेली आहे. जुन्या झालेल्या एका थांब्यावरील बसण्याचे आसनच गायब झाले आहे. भोसरीतील पीसीएमसी चौकातील बस थांब्यावरून निगडी, पिंपरी, चिंचवडसह शहर परिसरात बस ये-जा करत असल्याने या ठिकाणी प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे या ठिकाणी असलेले बस थांब्याचे एक निवारा शेड तोकडे पडत आहे.
पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पीएमटी चौकाजवळ गवळीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बस थांब्यावरून पुणे, स्वारगेट, कात्रज, खडकी, शिवाजीनगर आदि भागांकडे तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील बस थांब्यावरून राजगुरुनगर, खेड, चाकण, मोशी आदिभागांकडे बस ये-जा करतात. त्यामुळे या थांब्यावरही प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. असे असतानाही या ठिकाणी बस थांबा नाही.
दिघीतील मॅगझीन चौकात आळंदी-पुणे पालखी मार्गावर रस्त्याच्याकडेला बसथांबा उभारला आहे. या थांब्यावर बस न थांबता बीआरटीएस मार्गातून जाते. मात्र बीआरटीस मार्गावर निवारा शेड नाही.
बस थांबा गायब
पुणे-नाशिक महामार्गावर आदिनाथनगरजवळ असलेल्या थांब्यावरील निवारा शेड एक वर्षापूर्वी काढण्यात आले आहे. मात्र, या थांब्यावरील शेड कोणी काढले याचा पीएमपीच्या प्रशासनाला पत्ताच नाही. त्यामुळे या थांब्याचे गूढ वाढले आहे.
प्रवाशांना उन्हाची झळ
बस थांब्यावर निवारा शेड नसल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला आदींना उन्हाचा अधिक त्रास होत आहे. काही वेळेस ज्येष्ठ नागरिक आणि महिला बसची वाट पाहत अधिक वेळ उन्हात थांबल्यामुळे त्यांना भोवळही आल्याचा प्रकार घडल्याचे काही प्रवासी सांगतात.
प्रवाशांना झाडे, उड्डाणपुलाचा आधार
पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील असलेल्या बस थांब्यावरील प्रवासी बसची वाट पाहत राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील सावलीत थांबतात. मात्र, बस आल्यावर ती पकडण्यासाठी त्यांना धावपळ करावी लागते. त्यामुळे वाहनांच्या वर्दळीच्या या रस्त्यावर प्रवाशांना अपघात होण्याची शक्यता आहे. टेल्को रस्त्यावर शांतिनगर चौकाजवळ असलेल्या बसथांब्यावर निवारा शेड नाही. मात्र येथे रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडांच्या सावलीचा आधार प्रवाशांना मिळत आहे.
जाहिरातीच्या मोबदल्यात निवारा शेड
पीएमपीएमएलच्या जाहिरात विभागाद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील बसथांब्यावर शेड उभारण्याचे काम ठेकेदाराला दिले जाते. या निवारा शेडची जबाबदारी पंधरा वर्षांसाठी ठेकेदाराकडे दिली जाते. निवारा शेड उभारण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराला निवारा शेडवर जाहिरात करण्याचे हक्क पीएमपीएमद्वारे दिले जातात.
ठेकेदाराने पीएमपीने ठरवून दिलेल्या आराखड्याप्रमाणेच निवारा शेड बांधण्याच्या अटीवर ठेकेदाराकडे हे काम दिले जात असल्याची माहिती पीएमपीएमएलच्या एका अधिकाऱ्याने दिली.
पीएमपीद्वारे पुणे आणि शहरात गेल्या वर्षी तीनशे निवारा शेड उभारण्याचे काम हाती घेतले होते. ते अद्यापही सुरू आहे. त्याचप्रमाणे आणखी दोनशे निवारा शेड बसथांब्यावर उभारणीच्या कामासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. २३ डिसेंबर टेंडर भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर प्रशासकीय पूर्ततेनंतर याही वर्षी दोनशे निवारा शेड पीएमपी बस थांब्यावर उभारण्याचे काम सुरू होईल.
- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक (कमर्शिअल), पीएमपीएमएल
भोसरीतील पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज बसथांब्यावर निवारा शेड नाही. त्यामुळे त्यामुळे उन्हात ताटकळत थांबावे लागते. याचा विद्यार्थी आणि लहान मुलांना अधिक त्रास होत आहे.
- सुरेखा मानमोडे, प्रवासी