
सोलापूर (Solapur) : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत टेंभुर्णी-लातूर महामार्गाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या महामार्गाच्या निधीच्या प्रस्तावास लवकर मंजुरी द्यावी. या महामार्गाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
खासदार ओमराजेंची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्ण करत या महामार्गासाठी ५७४.१८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, लातूर, उदगीर, नागपूर, नांदेड या शहरांना जोडण्यासाठी हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. या महामार्गावरून कृषी माल व व्यावसायिक माल वाहतूक करणे सोपे होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग ६५, ५२, ५४ सीवरून वरील शहरांना जोडण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग ठरणार आहे. चौपदरीकरणामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांशी संपर्क साधण्यासाठी कमी वेळ लागणार आहे.
संसदेत खासदार निंबाळकरांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्री नितीन गडकरींनी घरी समक्ष भेटण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने खासदार ओमराजेंनी त्यांची घरी भेट घेतली असता त्यांनी कामाबाबत निधी मंजुरीची माहिती समाजमाध्यमांवरही टाकल्याचे सांगितले. या महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याने धाराशिव परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे.