Solapur : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळाला मीटरच पर्याय; महापालिकेने...

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal CorporationTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : शहरवासीयांकडून प्रत्यक्ष वापर होत असलेल्या पाण्यापैकी ५० टक्के पाणी हे रस्ते, घर, वाहने धुण्यासाठीच होत आहे. त्यामुळे शहराला समतोल पाणीपुरवठा होण्यामध्ये व्यत्यय येत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी संबंधित मिळकतदारांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, इतक्या मिळकतदारांवर प्रत्यक्षात कारवाई होणे शक्य नसल्याने ही परिस्थिती अधिकाऱ्यांच्याही हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे नळाला मीटर लावणे हा एकमेव पर्यायच प्रशासनासमोर उभा आहे.

Solapur Municipal Corporation
Pune ZP : ग्रामपंचायतींनी मागणी केलेल्या जनसुविधांची कामे लागणार मार्गी कारण...

पाणी येण्याच्या दिवशी शहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहते. घरातील पाणी साठवणुकीनंतर घरे, रस्ते व वाहने धुण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांची संख्या ही ७५ टक्के इतकी आहे. अमृत योजनेंतर्गत शहरात गरजेच्या ठिकाणी जलवाहिनी टाकून टॅंकरवरचा खर्च वाचविण्यात आला. जलवाहिनीची दुरुस्ती करून ४८ टक्क्यांवरील गळती १० टक्क्यांवर आणली. मात्र नागरिकांकडून होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यातच नागरिकांना १८० दिवस पाणी देऊन ३६५ दिवसांचे बिल आकारले जाते, अशी ओरड नागरिकांसह लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळे प्रशासनाने नळाला मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

Solapur Municipal Corporation
Navi Mumbai : 'यामुळे' नवी मुंबई मेट्रो सेवा ठरली राज्यातील एकमेव सरस

स्मार्ट सिटी अंतर्गत घरगुतीसह व्यावसायिक अशा साधारण एक लाख ३१ हजार मिळकतींना मीटर बसविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ८४ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु निधीअभावी हे टेंडर रद्द करण्यात आले. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी घरगुती मीटर अत्यावश्यक असल्याने महापालिकेने मार्च २०२३ मध्ये दुसऱ्यांदा कमी बजेटमध्ये २८ कोटींची दुसरी निविदा काढली. त्यामध्ये एएमआर (अॅटोमॅटिक मीटर रीडिंग) व एमआर (मेकॅनिकल मीटर) बसविण्यात येणार आहे. सध्या हे सर्वच विषय रखडले आहेत. दरम्यान, जलवाहिनी नवीन असताना आणि पाण्याला चांगला दाब असूनदेखील अनेकांना पाणी मिळत नसल्याची तक्रार होती. यावर उपाययोजना म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी महापालिका आयुक्तांनी पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना दिले. मात्र, परिस्थिती अधिकाऱ्यांच्या हाताबाहेरील असल्याने कारवाईचे धाडस त्यांनी दाखवले नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मीटर एकमेव पर्याय असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

या पाण्याचा हिशेबच नाही

उपसा होणारे पाणी, जलवाहिनीतून टाकीत जाणारे पाणी आणि टाकीतून वितरित होणाऱ्या पाण्याची मोजमाप करण्याकरिता फ्लोमीटर बसविण्यात आले आहे. मात्र, घरोघरी होणाच्या पाण्याच्या अपव्ययाचा हिशेब महापालिकेला लागला नाही.

या आहेत तक्रारी...

- नळाला कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा

- पाणी बंद होईपर्यंत काही भागात मोटारी बंद होत नसल्याने शेवटच्या मिळकतदारांपर्यंत पाणी पोचत नाही.

- वाहने, रस्ते व घरे धुतली जात असल्याने रस्त्यावर पाण्याचे ओहोळ; परिणामी पाणी साचून रस्ते होताहेत खराब.

- पाण्याचा अनावश्यक वापर करणारे एक आणि पाणी साचते दुसऱ्यांच्या घरासमोर; त्यातून जाताहेत भांडणे व वाद विकोपाला.

शहरातील मिळकतींची संख्या

- नळांची संख्या : १ लाख ४५ हजार

- एबीडी एरियात बसविण्यात आलेले मीटर : साधारण १५ हजार

- मीटरसाठीचा आराखडा : १ लाख ३० हजार घरांचा

- आवश्यक निधी : साधारण ३० कोटी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com