
सोमेश्वरनगर (Someshwarnagar) : बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाशी संलग्न असे शंभर खाटांचे जागेअभावी प्रलंबित राहिलेले रुग्णालय अखेर वाघळवाडी गावात होणार आहे.
ग्रामस्थांनी दहा एकर गायरान उपलब्ध करून देण्याचा निर्णय एकमताने ग्रामसभेत घेतला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढची त्वरित सूत्रे हलविली. सरकारी पाहणी समितीने सदर गायरानावर शिक्कामोर्तब केले असून, जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी मिळताच काम सुरू होणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी सोमेश्वरनगर भागात १०० बेडचे हॉस्पिटल करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याशी चर्चा करून दोनच दिवसांत शासन निर्णय काढला आणि ७७ कोटी ७९ लाख रुपये निधीची तरतूद करत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनिस्त १०० खाटांचे रुग्णालय, सोमेश्वरनगर-वाघळवाडी’ अशी मंजुरी आणली. एकूण रकमेपैकी बांधकामासाठी ६४ कोटी ४८ लाख रुपये खर्चास १ ऑक्टोबरला वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रशासकीय मंजुरीही दिली.
रुग्णालयासाठी प्रशस्त जागा शोधण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू होते. कारखान्यापासून काही अंतराचेही बंधन होते. यातून कारखान्याच्याच शिक्षणसंस्थेच्या निंबूत हद्दीतील जागेचा पर्याय पुढे आला होता.
दरम्यान, वाघळवाडीतील दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी सह्यांच्या अर्जाद्वारे गावातील सरकारी गायरान जागा हॉस्पिटलला द्यावी, अशी मागणी केली. सरपंच ॲड. हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत दहा एकर गायरान देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
वाघळवाडी मध्यवर्ती ठिकाण असून, जागा सोयीची असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने समक्ष भेटून पटवून दिले. पवार यांनी तत्काळ अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना सूचना केल्या.
नुकतीच डॉ. म्हस्के, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, वैद्यकीय अधिक्षक अमोल शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एम. मुखेकर यांच्या पथकाने जागापाहणी केली आणि निकषानुसार जागा योग्य असल्याची माहिती पवार यांना दिली. यानंतर पवार यांनी पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या असून हॉस्पिटल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या कामी ज्येष्ठ नेते प्रमोद काकडे, हेमंत गायकवाड, गणेश जाधव, सतीश सकुंडे, अजिंक्य सावंत, विजय सावंत, जितेंद्र सकुंडे, तुषार सकुंडे, अनिल शिंदे, अँड. अनंत सकुंडे, अजय सावंत, रामचंद्र गायकवाड, गणेश शिंदे यांनी पाठपुरावा केला.
त्वरित मोजणी करून पंचायत समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना गायरान हस्तांतरण प्रस्ताव देत आहोत. त्यानंतर टेंडर निघतील. याबाबत अजितदादांचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया ॲड. हेमंत गायकवाड यांनी दिली.