
चाकण (Chakan) : ‘पीएमआरडीए’च्या (PMRDA) विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली आहे. त्याअंतर्गत चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीएचा चाकणसाठी प्रस्तावित रासेफाटा कडाचीवाडी, मेदनकरवाडी हा बाह्यवळण मार्ग लवकरच होणार आहे.
या मार्गाला यापूर्वी १०० कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. अजूनही निधी मंजूर होऊन या मार्गाला अंदाजे २०० ते २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आता निधी मिळणार असल्याने या मार्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
चाकणचा बाह्यवळण मार्ग होणार असे गेल्या ३० वर्षांपासून सांगितले जाते. परंतु वाहतूक कोंडीला पर्याय असणारा हा बाह्यवळण मार्ग काही होत नाही. त्यामुळे उद्योजक, नागरिक, वाहनचालक, कामगार सारेच संतापले आहेत. या मार्गाच्या अंतिम हद्दी निश्चित करून मार्गाचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी होत आहे.
राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव येथे बाह्यवळण मार्ग झाल्यानंतर चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे.
असा असेल बाह्यवळण मार्ग
चाकण बाह्यवळण मार्ग हा रासेफाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, बंगला वस्ती असा सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा आहे. हा मार्ग ३६ मीटर रुंदीचा चार पदरी आहे. दोन्ही बाजूंना दोन लेन राहणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी चौक करण्यात येणार आहेत.
बाह्यवळण मार्गाच्या बहुतांश जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत, तसेच काही ठिकाणी निवासी बांधकामेही झाली आहेत. या जमिनी संपादित करताना शेतकऱ्यांना तसेच इतरांना एफएसआय तसेच रोख रक्कमेचा मोबदला देण्यात येणार आहे, असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन झाल्यानंतर या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी एजन्सीची नेमणूक केल्यानंतर ही एजन्सी मार्गाच्या हद्दनिश्चितीसह इतर कामे करणार असल्याचे पीएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन मार्गाचे काम मार्गी लागणार आहे.
अपघात कमी होतील
चाकण शहरातील व पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-शिक्रापूर, चाकण-तळेगाव या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, तसेच अवजड वाहतूक शहराबाहेरून जाण्यासाठी चाकणचा बाह्यवळण मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे अपघात कमी होतील. औद्योगिक वसाहतीतील वाहतूक या मार्गाने येऊन चाकण-शिक्रापूर मार्गाकडे जाणार आहे. शिक्रापूर मार्गाने आलेली अहिल्यानगर, मराठवाड्यातील वाहतूक पुणे-नाशिक महामार्गावर येऊन पुणे, नाशिक, तळेगाव, मुंबई या भागाकडे जाणार आहे.
कागदावरील मार्ग प्रत्यक्षात आणावा
हा मार्ग लवकर व्हावा, पीएमआरडीएने केवळ कागदावरच मार्ग करू नये. तो प्रस्तावित न ठेवता प्रत्यक्षात काम लवकर सुरू करावे अशी मागणी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, पीएमआरडीएचे सदस्य वसंत भसे, मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, उपसरपंच महेंद्र मेदनकर, ॲड. संकेत मेदनकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी केली आहे.
चाकण बाह्यवळण मार्गाचे काम लवकर सुरू होणार आहे. त्याची टेंडर प्रक्रिया येत्या काही महिन्यात सुरू होईल. या मार्गाचा अंतिम आराखडा लवकरच तयार होईल. या मार्गासाठी अपेक्षित खर्चाचा तपशील तयार करण्याचे काम सुरू आहे. या मार्गासाठी १०० कोटींचा निधी यापूर्वीच मंजूर झालेला आहे. अजूनही निधी मंजूर होईल. लवकरच या मार्गाच्या कामाला गती मिळेल.
- योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए