
पुणे (Pune) : सतत वाढत्या वाहतूक कोंडीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर पुणे ते शिरूर टप्प्यात अनेक वर्षांपासून रखडलेला, मात्र सध्या टेंडर प्रक्रियेत असलेला उड्डाण पूल प्रकल्प, रस्ते रुंदीकरण, पर्यायी बायपास रस्ते तातडीची पूर्ण होणे गरजेचे आहे. वाढत्या वाहतूक कोंडीचा फटका येथील उद्योग जगतालाही बसत असून, उद्योगांच्या स्थलांतरामुळे पर्यायाने या परिसराच्या विकासावरही विपरीत परिणाम होत आहे.
पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरून रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत, तसेच विदर्भ, मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्या दररोजच्या वाहनांची संख्या सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त आहे. वाहनांची ही वाढती संख्या व कमी पडत असलेला महामार्ग यामुळे या मार्गावर सर्वाधिक नागरिकरण झालेल्या वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव गणपती या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न सतत भेडसावत आहे. तर या मार्गावरील औद्योगिक वसाहतीवरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. रोजच्या कोंडीमुळे अनेक नोकरदारांसह काही उद्योगांनीही या भागातून स्थलांतर केले आहे. मात्र या स्थलांतराचा फटका स्थानिक विकासावर होत आहे. दरम्यान या वाहतूक कोडींवर प्रभावी उपाययोजना ठरणाऱ्या पुणे ते शिरूर व चाकण ते शिक्रापूर दरम्यान सुरू असलेली सलग उड्डाण पुलांची कार्यवाही शासनाकडून १० वर्षांहूनही अधिक काळ सातत्याने रेंगाळत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडून प्रवासी व नागरिकांचा मनस्तापही वाढत आहे. तसेच, या उड्डाण पुलांच्या प्रकल्पांचा खर्चही वाढत आहे. सध्या हे उड्डाणपूल उभारणीची जबाबदारी केंद्र सरकारकडून पुन्हा राज्य सरकारच्या एमएसआयडीसीकडे आली असून, या प्रकल्पांच्या रिटेंडर निघून हे काम कधी सुरू होते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुणे ते शिरूर टप्प्यातील वाहतूक कोंडीची प्रमुख ठिकाणे
वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव
वाहतूक कोंडीची कारणे
•सातत्याने रेंगाळत असलेले उड्डाण पूल प्रकल्प
* वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत अरुंद रस्ते
* पर्यायी बाह्यवळण रस्त्यांचा अभाव
* चौकांमध्ये समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) व भुयारी मार्ग नाहीत
* वाहनसंख्येच्या तुलनेत मर्यादित पोलिस बळ
* महामार्गालगत अनधिकृत पार्किंग
* सिग्नल, लेन व वाहतुकीचे नियम न पाळणारे बेशिस्त वाहनचालक
* जड वाहने व खासगी ट्रॅव्हल्सची वाढलेली संख्या
* व्यावसायिकांचे पदपथ व महामार्गालगत अतिक्रमण
* वाढते अपघात व नादुरुस्त वाहने
वाहतूक कोंडीवर उपाय
* सलग दुमजली उड्डाण पुलाची गरज
* शक्य तेथे रस्ते रुंदीकरणाची आवश्यकता
* चौकात भुयारी मार्ग व सिग्नल
* वाहतूक नियोजनासाठी पुरेसे पोलिस संख्याबळ व वॉर्डन
* गर्दीच्या गावात, शहरात पर्यायी बाह्यवळण रस्ते
* वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम व शिस्त पालन हवे
* सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावी झाल्यास खासगी वाहनांचे प्रमाण घटेल.
रिंगरोडचे काम तातडीने व्हावे
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे शहरालगत सुरू असलेले रिंगरोडचे काम लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे. सध्या रिंगरोडच्या सोळू ते वाघोली या टप्प्यातील कामाची कार्यवाही प्राधान्याने सुरू आहे. रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे ते नगर रस्ता व पुढे पुणे-सोलापूर रस्ताही रस्ते विकास महामंडळाच्या रिंगरोडद्वारे जोडले जाणार आहेत. त्यामुळे शहरांतर्गत तसेच पर्यायाने पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणे-शिरूर उड्डाण पूल प्रकल्पाची सद्य:स्थिती
पुणे ते शिरूर रस्त्यावर एमएसआयडीसीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या बहुमजली उड्डाण पूल प्रकल्पास राज्य शासनाने मंजुरी दिल्याने या कामाच्या टेंडर प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. डिझाइन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्स्फर (डीएफबीओटी) या मॉडेलवर सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारला जाणाऱ्या या प्रकल्पात आवश्यक तेथे भूसंपादनासह कामाला मार्च २०२५नंतर सुरूवातीबाबत संबंधित विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. खराडी ते शिरूर बायपास दरम्यान नियोजित या बहुमजली उड्डाण पुलावर वरच्या मार्गावर मेट्रो, त्याखाली चारचाकी वाहने, तर तळमजल्याच्या रस्त्यावरून अवजड वाहतूक अशी व्यवस्था असणार आहे. यात खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डाण पुलाला एक्झिट असणार आहे.
औद्योगिक वसाहतीतही मोठ्या संख्येने कामगार, अधिकारी, उद्योजक यांच्या वाहनांची ये-जा असल्याने कोंडीमुळे उद्योगांवर अनिष्ट परिणाम होत असून, अभावानेच मिळणारा चांगला कर्मचारी वर्ग नोकऱ्या सोडून जात आहे, तसेच कोंडीत अडकल्याने दररोज मानवी तासांचेही मोठे नुकसान होत आहे. नव्या प्रकल्पात उड्डाण पूल व मेट्रो सेवेने औद्योगिक परिसर शहराशी लवकर जोडला जाणे फार गरजेचे आहे.
-प्रकाश धोका, माजी अध्यक्ष, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड असोसिएशन
वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी उड्डाण पूल प्रकल्पाची तातडीने उभारणी, रस्ते रुंदीकरण, पर्यायी बायपास मार्ग, चौकात पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग पट्टे, ध्वनीवर्धकासह प्रभावी सिग्नल यंत्रणा, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहेच. मात्र, याबरोबरच स्वयंशिस्तीसाठी जागृती व कारवाईसाठी प्रशासनाच्या साथीला निमशासकीय समितीचे गठण करणे आवश्यक आहे.
- संपतआबा गाडे, जनसेवक, पुणे-नगर रोड वाहतूक कृती समिती