
Satara
Tendernama
सातारा (Satara) : पालिकेच्या अख्यातरीत असणाऱ्या मंगळवार पेठेतील विविध विकासकामांच्या वर्क ऑडर्स घेवून एक वर्षांचा कालावधी झाला तरी त्यातील कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली नसल्याचे समोर येत आहे. या कामांच्या वर्क ऑर्डर घेवून कामे न करणाऱ्या गौरव रायसिंग जाधव (रा. पंताचा गोट, सातारा) या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठीचा तक्रार अर्ज माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पालिका प्रशासनाकडे केला आहे. या तक्रार अर्जात संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत न टाकल्यास मार्चपासून बेमुदत उपोषणाचा इशाराही मोरे यांनी दिला आहे.
सातारा पालिकेच्या विविध विभागांनी जाहीर केलेल्या टेंडर प्रक्रियेत गौरव रायसिंग जाधव (रा. पंताचा गोट, सातारा) हा ठेकेदार सहभाग नोंदवत असे. पालिकेने २०२०-२०२१ या काळात विविध विकासकामांचे टेंडर जाहीर केले होते. यामध्ये नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या १५ टक्के राखीव निधीसह दलितवस्ती सुधार योजनेतील अनेक कामांचा समावेश होता. या कामांसाठी पालिकेने ३ ते ९९ लाख रुपयांपर्यंतच्या निधीची तरतुद केली होती. यासाठीच्या टेंडर प्रक्रियेत गौरव जाधव या ठेकेदाराने सहभाग नोंदवला होता. यानुसार प्रशासकीय, तांत्रिक बाबी पुर्ण करणाऱ्या जाधव या ठेकेदारास पालिकेच्यावतीने सुमारे २ कोटी १६ लाख रुपये निधीची तरतुद असणारी पाच कामे देण्यात आली. या कामांमध्ये बगीचा व खेळाचे मैदान विकसित करणे, संरक्षक भिंत बांधणे, रस्ता काँक्रिटीकरण, गटार व पाईपड्रेन करणे, चेंबर बांधणे आदी कामांचा समावेश होता. या कामांच्या पुर्ततेसाठी कामाच्या स्वरुपानुसार पालिकेने त्या ठेकेदारास ३० दिवस ते ३०० दिवस इतकी मुदत दिली होती. ही कामे त्या ठेकेदाराने वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर मुदतीत पुर्ण करणे अपेक्षित होते, मात्र त्या ठेकेदाराने कामे रखडविण्यात धन्यता मानली.
जाहीर केलेली कामे मुदतीत पुर्ण होत नसल्याने त्या भागातील नागरीकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र त्यावर देखील पालिकेने कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्या ठेकेदारास काम पुर्ण करण्यासाठीची मुदतवाढ दिली नाही. वर्क ऑर्डर मधील नमुद काम आणि त्यासाठीचा कालावधी संपुन गेल्यानंतरही विकासकामे रखडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याबाबतची माहिती सातारा येथील सुशांत मोरे यांनी माहितीच्या अधिकारात मागवली. यानुसार माहितीची पडताळणी तसेच प्रत्यक्ष स्थळपाहणी केल्यानंतर जाधव या ठेकेदाराने निविदा प्रक्रियेतील नियमांना हरताळ फासल्याचे समोर आले. यामुळे त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यासाठीचा अर्ज मोरे यांनी सातारा पालिकेकडे केला आहे. यात त्यांनी जाधव या ठेकेदारास काळ्या यादीत न टाकल्यास बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला आहे.
लाडका ठेकेदार
सातारा पालिकेच्या विविध विभागाकडून जाहीर होणाऱ्या टेंडर प्रक्रियेत अनेक ठेकेदार सहभागी होत असतात. या ठेकेदारांपैकी गौरव जाधव हे पालिकेच्या एका शिर्षस्थ पदाधिकाऱ्याचा लाडका ठेकेदार होता व तो त्या पदाधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत होता. शिर्षस्थ पदाधिकाऱ्याच्या आर्शिवादामुळेच त्याला शेलकी व कमी त्रासाची कामे मिळतात, अशी चर्चा पालिकेत नेहमी सुरु असते.