
Parking
Tendernama
मुंबई (Mumbai) : महापालिकेच्या पार्किंग धोरणाची मुदत मार्च २०२२ ला संपत आहे. त्यामुळे पार्किंगचे सुधारित धोरण तयार करण्यात येत असून, त्यात परिसरातील रेडिरेकनरचा दर आणि वाहनांची वर्दळ यानुसार सार्वजनिक वाहनतळांचे शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. येत्या काळात विभागानुसार वाहनतळ आराखडा तयार केला जाणार आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात वाहनमालकांवर शुल्काचा भार पडणार आहे.
महापालिकेने २०१५ मध्ये वाहनतळ धोरण तयार केले होते. त्यात सार्वजनिक वाहनतळांची चार प्रकारांत विभागणी करून सर्वाधिक व्यग्र असलेल्या ठिकाणी पार्किंगचे शुल्क सर्वाधिक ठेवले होते. तसेच, पूर्वीच्या शुल्कांपेक्षा हे दर अनेक पटीने वाढवले होते. 'पार्किंगच्या विद्यमान धोरणाची मुदत २०२२ ला संपत आहे. या धोरणाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे,' अशी माहिती पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी वाहनतळांबाबत अर्थसंकल्पीय चर्चेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाने ही माहिती सादर केली आहे.
महापालिकेला वाहनतळांच्या शुल्कातून वार्षिक १०० कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, प्रशासन जाणूनबुजून या उत्पन्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचेही राजा यांनी नमूद केले होते. त्यावर प्रशासनाकडून स्थायी समितीत माहिती सादर करण्यात आली आहे.
वाहनतळासाठी सर्वेक्षण
१) पार्किंग धोरणात सुधारणा करण्यासाठी दिल्ली, चंदीगड आदी शहरांसह परदेशातील काही शहरांच्या वाहनतळ धोरणाचा अभ्यास केला जात आहे. लवकरच अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
२) मुंबईतील जागांचा रेडिरेकनर दर तसेच त्या परिसरात असलेल्या वाहतुकीची वर्दळ यानुसार हे शुल्क ठरवले जाण्याची शक्यता आहे. महापालिका प्रत्येक विभागाच्या गरजेनुसार वाहनतळ धोरण तयार करत आहे. त्यासाठी सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे.
असे सुरु आहे काम
- महापालिकेने वाहनतळांचे नियोजन करण्यासाठी मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
- प्रक्रिया पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण होईल. राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर हे प्राधिकरण अस्तित्वात येईल.
- सध्या वाहनतळांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येत आहे. विभागस्तरानुसार वाहनतळ आराखडा तयार केला जात आहे.
- स्थानिक गरजेनुसार वाहनतळांची क्षमता तयार केली जाणार आहे. यासाठी पार्किंग पूलसारखी योजना राबवली जाईल.
- वाहनतळांच्या नियोजनासाठी मोबाईल ॲप्लिकेशन. यात जागांची उपलब्धता कळेल. तसेच पार्किंग शुल्क ऑनलाईन भरता येईल.
टेंडर प्रक्रिया सुरू
मुंबईतील रस्त्यांवर ६९ वाहनतळ असून त्यातील ४५ वाहनतळ सशुल्क आहेत; तर उर्वरित २४ वाहनतळांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर विकसकांकडून ६८ पैकी ३२ बहुमजली वाहनतळ हस्तांतरित झाले आहेत. त्यातील २९ ठिकाणी सुरू आहेत; तर तीन वाहनतळांसाठी कंत्राटदार नेमण्याची टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईतील खासगी संकुलातील वाहनतळ बाहेरील वाहनांना वापरण्यास देण्याचे प्रयोजन आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे वाटप करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे.
- डॉ. इक्बाल सिंह चहल, मुंबई महापालिका आयुक्त