

मुंबई (Mumbai): वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेसाठी दावोस येथे दाखल झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरणावर जागतिक उद्योगजगताचा विश्वास वाढत असल्याचे स्पष्ट केले.
“महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास अधिक दृढ झाला आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
World Economic Forum जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह महाराष्ट्राचे प्रतिनिधीमंडळ दावोसमध्ये दाखल झाले आहे. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या औद्योगिक क्षमता, धोरणे आणि पायाभूत सुविधांचे सादरीकरण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या दिशेने सक्षम इकोसिस्टिम तयार केली आहे. त्याचाच लाभ महाराष्ट्राला होत आहे.” महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी ‘Gateway of India’ असून, इतर राज्यांशी असलेली सकारात्मक स्पर्धा देशासाठी उपयुक्त असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राकडे लक्ष
राज्यातील सर्व भौगोलिक भागांमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, 10 ते 12 वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील उद्योगांशी समन्वय साधला जात आहे. तिसरी मुंबई उभारणीच्या प्रक्रियेत असून, त्या प्रकल्पासाठी मोठ्या गुंतवणुकीचे संकेत मिळत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी एक प्रकारे ‘चावडी’ असल्याचे सांगत, दरवर्षी महाराष्ट्राची क्षमता येथे प्रभावीपणे मांडली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे 60 ते 65 सामंजस्य करार प्रत्यक्षात आणले असून, गुंतवणूक करारांच्या अंमलबजावणीत राज्य देशात आघाडीवर आहे.
2030 चे लक्ष्य
गेल्या दशकात महाराष्ट्राने सरासरी 10 टक्क्यांहून अधिक विकासदर राखला असून, राज्य 2032 पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनू शकते. मात्र, हा टप्पा 2030 पर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
FDI, MSME आणि नवतंत्रज्ञान
देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 39% FDI महाराष्ट्रात
MSME क्षेत्र रोजगारनिर्मितीचा कणा
गेल्या वर्षी 16 लाख कोटींचे सामंजस्य करार, दावोस करारांचे 75–80% रूपांतरण
AI, डेटा व स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र आघाडीवर
देशातील 60% डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात
महाराष्ट्रात गुंतवणूक सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सर्वोत्तम आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.