
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको (CIDCO) एन - ६ जकातनाका येथील जड वाहनाच्या धडकेत दुभाजकाचा काॅर्नर तुटला होता. यासंदर्भात काही सुपारीबाज कार्यकर्त्यांनी सदर काम निकृष्ट असल्याचा संभ्रम निर्माण करत समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठवली होती. यासंदर्भात 'टेंडरनामा'कडे प्राप्त तक्रारीनुसार प्रतिनिधीने स्पाॅटपंचनामा केला असता, येथील व्यापाऱ्यांनी दुभाजकाच्या कामाचा दर्जा चांगला असल्याची सचित्र माहिती 'टेंडरनामा'कडे दिली होती. यामुळे 'टेंडरनामा'ने ठेकेदाराच्या (Contractor) बाजूने कौल देत वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्तानंतर ठेकेदाराने क्षणाचाही विलंब न करता दुभाजकाची दुरुस्ती करत वाहनधारकांची मने जिंकली.
या वृत्तानंतर शहरातील अनेक प्रकल्पातील ठेकेदार कंपन्यांनी 'टेंडरनामा'चे अभिनंदन केले. विशेष म्हणजे नाव न छापण्याच्या अटीवर टेंडरमध्ये घोळ कसे असतात, संबंधित अधिकाऱ्यांची टक्केवारी किती असते, टेंडर भरल्यानंतर खुले करण्यासाठी कसा पाठपुरावा करावा लागतो, मर्जीतल्या ठेकेदारांना कशा पद्धतीने कामे दिली जातात. प्री-बीड मिटींग घेण्यासाठी व त्याचा खर्च करण्यासाठी ते कार्यारंभ आदेश प्राप्त करून घेण्यासाठी, तसेच प्रत्यक्षात काम चालू झाल्यावर कामातील अडथळे दूर करण्यासाठी खालपासून वर पर्यंत अधिकाऱ्यांचे कसे पापड बेलावे लागतात, त्याचा सार्वजनिक कामावर कसा परिणाम होतो, याची धक्कादायक माहिती 'टेंडरनामा'शी बोलताना ठेकेदारांनी दिली.
विशेष म्हणजे येथील लोकप्रतिनिधी देखील एखाद्या सार्वजनिक कामासाठी मीच पाठपुरावा केला, त्यामुळे मर्जीतल्याच ठेकेदाराला टेंडरप्रक्रियेत सहभागी होण्यास भाग पाडतात. नियमानुसार टेंडरप्रक्रियेत तीन ठेकेदार सहभागी होणे अपेक्षित असते, त्याची पूर्तता करण्यासाठी सपोर्टेड ठेकेदार देखील त्यांचेच असतात. कुणी किती 'बिलो' अथवा 'अबोव्ह' भरायचे याचा मालमसाला संबंधित शाखेचे टेंडरक्लर्क चिरीमिरी घेऊन पुरवतात.
याचा परिणाम इतर ठेकेदारांवर होतो. अशा अनेक प्रकरणांची यादीच ठेकेदारांनी वाचून दाखवली. परिणामी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना इच्छा नसून देखील राजकीय दबाबापुढे शरणागती पत्करावी लागते. अशी अनेक उदाहरणे देत ठेकेदारांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे वस्तुस्थिती मांडली.
नेमके काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरातील दुभाजकांच्या दशावतारावर टेंडरनामाने सुरवातीपासूनच प्रहार केला. टेंडरनामाच्या वृत्तमालिकेचा आधार घेत ॲड. रूपेश जैस्वाल यांनी खंडपीठात खराब रस्त्यांच्या याचिकेत दुभाजकाचा देखील मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी तत्कालीन महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांना पत्रव्यवहार करत सुप्रीम कोर्टाने आय.आर.सी.ला दिलेल्या गाइडलाइन्स प्रमाणे शहरातील दुभाजकाची बांधनी आवश्यक असल्याचे कळवले.
त्यानुसार पांण्डेय यांनी शहरातीव ३१ किलोमीटरच्या रस्त्यावर दुभाजक बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पंधराव्या वीत्त आयोगातून तब्बल २२ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. दुभाजकांबरोबरच काही रस्त्यांवर फुटपाथ देखील बांधले जात आहेत.
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने आतापर्यंत भरीव निधी दिला. पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी देण्यात आला, त्यातून पाच रस्त्यांची कामे करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात शंभर कोटींचा निधी देण्यात आला, त्यातून तीस रस्त्यांची कामे करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात १५२ कोटींचा निधी देण्यात आला आहे, त्यातून २३ रस्त्यांची कामे केली गेली.
शासनाच्या निधीतून रस्त्यांची कामे करताना महापालिकेने रोड फर्निचरच्या कामाकडे लक्ष दिले नाही. सरसकट रस्ते बांधणीची कामे करण्यात आली. बहुतेक रस्त्यांची कामे सिमेंट काँक्रिटच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. रस्त्यांची कामे करताना सांडपाणी वाहून जाण्यासाठी साइड ड्रेन करणे गरजेचे असते, वाहतूक सुरळीत चालावी, अपघात होऊ नयेत म्हणून दुभाजक बांधावे लागतात. रस्त्यांवरून पायी जाणाऱ्यांसाठी फूटपाथ बांधावे लागतात. या कामांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आणि केवळ रस्ते बांधणीचे काम केले.
महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून ६३ कोटी २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा निधी खर्च करण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले होते. विविध कामांसाठी निधीची तरतूद करण्याचे कामकाज सुरू होते. त्यातच टेंडरनामाचे वृत्त आणि न्यायालयाने ओढलेले ताशेरे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र याचा विचार करून रस्त्यांवर दुभाजक बांधणे व फूटपाथ तयार करणे यासाठी बावीस कोटी रुपयांची तरतूद तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केली होती.
शहरातील ३१.६० किलोमीटरच्या रस्त्यांवर पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दुभाजक तयार करण्याचे काम लातूरच्या के. एच. कंन्सट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. याच ठेकेदाराने गोलवाडी रेल्वेपूल आणि रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे केल्याने तसेच इतर शहरातील गुणवत्ता तपासूनच त्याला हे काम देण्यात आले.
शहरातील सिध्दार्थ उद्यान ते भडकल गेट या दरम्यान ज्या पध्दतीने दुभाजक तयार करण्यात आला आहे, त्याच पध्दतीचे दुभाजक बांधनीचे काम सुरू असताना तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व आय.आय.टी.चे रिपोर्ट योग्य असताना दुसरीकडे याच ठेकेदाराला तब्बल २३३ कोटीचे जागतिक दर्जाचे छत्रपती संभाजीनगरातील रेल्वे स्थानकाचे काम मिळाले.
याचूनच काही ठेकेदारांना 'पोटदुखी'चा त्रास झाला आणि या कामाची कुठलीही शहानिशा न करता वाहनाच्या धडकेत दुभाजक फुटल्याचे सत्य बाजुला ठेऊन निकृष्ट कामाने दुभाजक फुटल्याची गावभर समाजमाध्यमांवर संभ्रम निर्माण करण्यात आला होता. यात काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी राजकारण न करता झालेल्या दुभाजकांमध्ये फुलांची, शोभेची झाडे लावावीत. चांगली काळीमाती टाकली गेली आहे. सध्या पावसाळी वातावरण आहे. या संधीचे सोने करावे, अशी महापालिका वर्तुळात चर्चा आहे.