talegaon Chakan Shikrapur Tendernama
टेंडर न्यूज

Big News तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज

चार लेनचा उन्नत मार्ग व चार लेनचा रस्ता; चाकण ते शिक्रापूर सहा लेनचा रस्ता

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गाने आणि चाकण ते शिक्रापूर मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या भागातील वाहतूक कोंडीला वैतागलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. (Talegaon - Chakan - Shikrapur Highway, Traffic News)

पुणे जिल्ह्यात तळेगाव-चाकण-शिक्रापूर या ५३ किमी राज्यमार्गावर तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग व समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर मार्गावर सहा पदरी रस्ता विकसित करण्याचा तसेच त्यासाठीच्या ४ हजार २०६ कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

तळेगाव- चाकण-शिक्रापूर हा रस्ता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील तळेगाव या ठिकाणाहून सुरु होऊन चाकण व पुढे शिक्रापूर या ठिकाणी पुणे-अहिल्यानगर महामार्गास जोडला जातो.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ व पुणे-छ.संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता पुणे शहराकरीता "बाह्यवळण"  म्हणून उपयोगी पडणार आहे. या मार्गामुळे अनेक ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

तसेच परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.  या रस्ते विकासात आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपुलासह बांधकाम केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून बीओटी तत्त्वावर हे काम केले जाणार आहे.