नाशिक (Nashik): नाशिक–पुणे रेल्वे मार्ग सरळ रेषेतूनच जावा या मागणीसाठी नगरमधील अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी नुकतेच २२ किलोमीटर अंतर पार करत अकोले–संगमनेर भव्य मोर्चा काढून संगमनेर प्रांत कार्यालयावर धडक दिली होती.
नाशिक-पुणे जलदगती रेल्वे प्रकल्प नाशिक - सिन्नर - अकोले - संगमनेर - चाकण या मूळ व सरळ मार्गानेच राबवण्यात यावा, या मागणीसाठी तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक-पुणे रेल्वेमार्ग देवठाण (ता. अकोले) मार्गे नेण्यासाठी पालकमंत्री म्हणून शब्द देतो, असे तेथील एका जाहीर सभेत म्हटले आहे. यामुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
यापूर्वी नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे संरेखन तीनवेळा बदलले असून आता नाशिक-शिर्डी- नगर-चाकण-पुणे असा रेल्वेमार्ग रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर मंत्री विखे यांनी अकोले तालुक्यातील एका जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग ही अनेक वर्षांची प्रलंबित मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी दहा टक्के हिस्सा देणार व उर्वरित निधी महारेल कॉर्पोरेशन कर्ज घेऊन उभारणार असे ठरले होते. त्यानुसार या रेल्वेमार्गासाठी नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर- नारायणगाव-चाकण -पुणे असे संरेखन करण्यात आले होते.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात या संरेखनात बदल करून तो मार्ग संगमनेर शहराजवळून प्रस्तावित केला. मात्र, या मार्गाच्या पूर्वशक्यता अहवालास रेल्वेमंत्रालयाची परवानगी न घेतल्याने तसेच हा रेल्वेमार्ग व्यवहार्य नसल्याचे कारण देऊन रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये तो प्रस्तावित मार्ग रद्द केला.
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मार्ग रद्द करू नये व हा मार्ग व्यवहार्य करून देऊ, अशी हमी दिल्यानंतर पुन्हा नव्याने या मार्गास चालना मिळाली व हा मार्ग मध्यरेल्वेतर्फे उभारण्याचे ठरले. त्यानुसार हा मार्ग व्यवहार्य ठरावा यासाठी नाशिक-सिन्नर-शिर्डी- नगर- चाकण या मार्गाने पुण्यास नेण्यास मंजुरी देण्यात आली असून या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्याचे रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
या मार्गाला सिन्नर, संंगमनेर, नारायणगाव येथील लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला आहे. रेल्वेमंत्र्यांना हजारो इमेल पाठवण्याबरोबरच जनआंदोलन उभारण्याची तयारी चालवली आहे.
या अनुषंगाने संगमनेरच्या नांदूर खंदरमाळ येथे सिन्नर, संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व विविध तालुक्यांतील रेल्वे कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे रेल्वे कृती समितीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीनंतर दोनच दिवसांनी अकोले तालुक्यातील देवठाण येथे पालकमंत्री विखे एका कार्यक्रमानिमित्ताने आले होते. त्यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात बोलताना नाशिक-पुणे रेल्वेमार्ग देवठाणमार्गे होणार असल्याचे जाहीर केले. नाशिक पुणे रेल्वेमार्गात झालेल्या बदलामागे विखे असल्याची टीका संगमनेरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जुना अकोले मार्गे जाणा-या या रेल्वेमार्गात बदल करून तो संगमनेरला कोणी नेला, अशीही टीका बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.
विखे यांनी केलेले वक्तव्य हे केवळ राजकीय स्वरुपाचे आहे किंवा शिर्डीमार्गे नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला वाढता विरोध लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालय खरोखर मार्गात बदल करण्याचा विचार करीत आहे, हे स्पष्ट होत नसले, तरी मंत्री विखे यांनी या रेल्वेमार्गाबाबत केलेल्या वक्तव्याने मार्ग बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे.