Simhastha Maha Kumbh Mela, nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela: सिंहस्थातील 23 हजार कोटींच्या कामांपैकी 12 हजार कोटींच्या कामांना भूसंपादनाचा अडसर

भूसंपादनाच्या अडचणींमुळे कुंभमेळ्यापूर्वी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना फटका

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात केंद्र व राज्य सरकार यांनी आतापर्यंत २३ हजार १२९ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी दिली असून त्यातील साडेदहा हजार कोटींची कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. उर्वरित कामे टेंडर, भूसंपादन या पातळीवर असून तीही लवकरच सुरू होतील व सिंहस्थ कुंभपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान आतापर्यंत केवळ साडेदहा हजार कोटींची कामे सुरू झाली असली, तरी अद्याप १३ हजार कोटींची कामे सुरू झाली नसून त्यातील जवळपास १२ हजार कोटींची कामे ही भूसंपादनाअभावी रखडली असल्याचे दिसत आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थकुंभ होत असतो. यानिमित्ताने देशभरातून साधू महात्मे येत असतात. भारतातील १३आखाडे व त्यांच्याशी संबंधित साधू महात्मे यांच्या निवासासाठी साधुग्राम उभारले जाते. तसेच पर्वणी काळात देशभरातून लाखो भाविक येतात. त्यासाठी वाहनतळ, रस्ते, बाह्यवळण रस्ते आदींची उभारणी केली जाते. याशिवाय गोदावरी स्वच्छता, भाविकांना स्नानासाठी घाट उभारणी केली जाते.

दरम्यान प्रयागराज येथील कुंभमेळ्यास भाविकांनी कुंभस्नानास अभूतपूर्व गर्दी केल्याने महाराष्ट्र सरकार व राज्य सरकार यांनी यावेळी अधिक भाविक येणार,हे गृहित धरून अनेक पायाभूत सुविधा उभारण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे यावेळी सिंहस्थ आराखडा हा साधारण २५ हजार कोटींचा आहे, असे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सांगितले असले तरी त्यात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंहस्थच्या निमित्ताने मंजूर झालेली कामे व प्रत्यक्ष सुरू असलेली कामे यांची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. 

महाराष्ट्र सरकारने सिंहस्थासाठी १३,११४ कोटी, तर इतर प्रकल्पांसाठी १,२५३ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे,  तर केंद्र सरकारने ८,७६१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे.

केंद्र व राज्य सरकार यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात रस्ते, पूल, घाट, वीज, पाणी, रेल्वे, रिंगरोड, विमानतळ, रेल्वेस्थानक आणि गर्दी व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील रिंगरोड,त्र्यंबकेश्वर येथील दर्शनपथ, त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी घाट, नाशिक येथील साधुग्राम, द्वारका चौक ते नाशिकरोड रस्ता रुंदीकरण, त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राम आदी जवळपास १२ हजार कोटींची कामे भूसंपादनाअभावी रखडली आहेत.

या ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामे सुरूहोऊ शकणार आहे. यामुळे ही कामे सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान कुंभमेळा प्राधिकरण समोर आहे.

केंद्राच्या निधीतील कामे

केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून घोटी त्र्यंबकेश्वर महामार्गासह २,७६३.२४ कोटींची ९ रस्ते कामे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग अंतर्गत ४,३५५.९२ कोटींची कामे, रेल्वेस्थानक विकासासाठी १,३२९.२४ कोटी, तसेच द्वारका सर्कल आणि रामकुंड परिसर सुधारणा यासाठी स्वतंत्र जवळपास ३०० कोटी रुपये मंजूर करण्यात निधी मंजूर आहे.

राज्याच्या निधीतील कामे

रिंग रोड तथा सिंहस्थ परिक्रमा मार्ग, ओझर विमानतळ विस्तारीकरण घाट विकास, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, वाहनतळ, होल्डिंग एरिया व व मलनिःसारण प्रकल्प बस टर्मिनस, रेल्वेस्थानक आधुनिकीकरण, वीज, पाणी व मलनिस्सारण प्रकल्प यांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या कुंभनिधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते प्रकल्पांसाठी २,२७०.६१ कोटी, कुंभमेळा प्राधिकरणच्या विविध कामांसाठी ९,३६०.७५ कोटी रुपये आणि मलनिःसारण प्रकल्पांसाठी १,४८२.९५ कोटी रुपये, असे  एकूण १३ हजार ११४.३१ कोटी निधी मंजूर आहे.

याशिवाय त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास (२७५ कोटी), वीज प्रकल्प (९४३.३६ कोटी) आणि कावनई, सर्वतीर्थ टाकेद व बेझे येथील विकास कामांसाठी ३५.०८ कोटी रुपये, असे १,२५३.४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. दोन्ही मिळून राज्य शासनाकडून एकत्रित १४, ३६७ कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. 

भूसंपादनाचा अडसर असलेली कामे

  • घोटी त्र्यंबकेश्वर महामार्ग

  • सिंहस्थ परिक्रमा मार्ग

  • द्वारका चौक ते नाशिकरोड रस्ता रुंदीकरण

  • तपोवन साधुग्राम

  • त्र्यंबकेश्वर दर्शनपथ

  • त्र्यंबकेश्वर येथील साधुग्राम

  • त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी घाट