Nashik: कसारा घाटात आणखी 2 रेल्वे मार्गांमुळे मुंबई तासाभराने जवळ येणार

Indian Railway
RailwayTendernama
Published on

नाशिक (Nashik) : नाशिक मुंबई रेल्वे सेवा गतिमान होण्यासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे कसारा घाट. या घाटातून जाताना रेल्वेगाडीला आणखी एक इंजिन जोडावे लागते. यामुळे कालहरण होऊन प्रवासाचा कालावधी वाढतो. मात्र, आता केंद्र सरकारने मनमाड ते कसारा या १३१ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर तिसरा व चौथा रेल्वेमार्ग टाकण्यास मंजुरी दिली असून त्यासाठी १० हजार १५४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

यामुळे लांबपल्ल्यांच्या गाड्यांना या घाटातून जाण्यासाठी वाढीव इंजिन जोडण्याची गरज पडणार नाही व कसारा घाटात रेल्वेचा वेग वाढणार आहे. नाशिक ते मुंबई रेल्वे प्रवास हा किमान एक तासाने कमी होणार असल्याचे मानले जात आहे. या नवीन दोन रेल्वे मार्गांमुळे मुंबई ते नाशिक लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.

Indian Railway
Nashik: रिंगरोडसाठी थेट खरेदी पद्धतीने जमिनी घेण्यास सुरवात; 'या' गावांतील शेतकरी तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक कार्य समितीने दोन दिवसांपूर्वी मनमाड ते कसारा या मार्गावर तिसरा व चौथा रेल्वेमार्ग टाकण्यास १० हजार १५४ निधी मंजूर केला आहे. मुंबई-हावडा या अत्यंत वर्दळीचा रेल्वेमार्ग आहे. यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून या मार्गाची क्षमता दुपटीने वाढवण्याचे काम सुरू आहे. तसेच मनमाड येथे या मार्गावर दक्षिण रेल्वेमार्ग जोडला जातो.

यामुळे मनमाड ते कसारा हा रेल्वेमार्ग आणखी वर्दळीचा झालेला आहे. यामुळे नाशिक व ठाणे जिल्ह्यातील मनमाड ते कसारा या रेल्वे मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी त्या मार्गवार आणखी दोन रेल्वेमार्ग टाकण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया यापूर्वीच सुरू झालेली असून कसारा घाटात आणखी दोन मार्ग टाकण्यासाठीचा तांत्रिक अभ्यासही पूर्ण झालेला आहे.

Indian Railway
Nashik: नाशिक-पालघर प्रवास आता सुसाट!

सध्याचा कसारा घाटातील रेल्वेमार्ग खूप जुना असून तो अधिक वळणावळणाचा व लांबून फिरून येणारा आहे. मात्र, रेल्वेने केलेल्या अभ्यासानुसार आता हे दोन नवीन मार्ग अधिक सरळ राहणार असून त्यावरून रेल्वेगाड्या जाण्यासाठी आणखी एक इंजिन जोडण्याची गरज लागणार नाही. या मार्गावर २६ किलोमीटर लांबीचे पाच बोगदे केले जाणार आहेत. तसेच ३ मोठे पूल बांधले जाणार आहे. याशिवाय १६ प्रमुख पूल असणार आहेत. मनमाड कसारा या १३१ किलोमीटर लांबीच्या मार्गावर २१६ लहान मोठे पूल असणार असून सर्वात मोठा पूल हा २४ किलोमीटर लांबीचा असणार आहे.

या वाढीव रेल्वे मार्गामुळे या मार्गावरील मालवाहतुकीत 4.6 कोटी टनाने वाढ होणारआहे. तसेच या मार्गावरील प्रवासी गाड्यांची संख्याही वाढणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार या रेल्वेमार्गामुळे मालवाहतूक क्षमता वाढणार असून त्यामुळे मालवाहतूक खर्चात १२०७ कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे कार्बन उत्सर्जनात दोन कोटी किलो घट होणार आहे. ही घट म्हणजे २ कोटी वृक्ष लागवड केल्यासारखे आहे.

Indian Railway
PM Narendra Modi: केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला दिली गुड न्यूज

नाशिक-मुंबई लोकलसाठी फायदा

मनमाड कसारा मार्गावर आणखी दोन रेल्वेमार्ग उभारल्याने नाशिक ते मुंबई रेल्वे प्रवास किमान तासाभराने कमी होणे शक्य आहे. तसेच सध्याच्या कसारा घाटातून लोकल रेल्वे चालवणे व्यवहार्य नसल्याचा रेल्वेचा दावा निकाली निघणार आहे. या नवीन दोन रेल्वेमार्गामुळे नवीन बोगद्यातून लोकल रेल्वेगाड्या सहज चालवल्या जाऊ शकणार आहे. यामुळे नाशिकसाठी अनेक वर्षांची प्रतीक्षा असलेली मुंबई नाशिक रेल्वेसेवा सुरू होण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com