NMC, Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik NMC: नाशिकमधील रस्त्यांच्या कामांची रोज होणार गुणवत्ता तपासणी; पालिकेची 28 रस्त्यांवर करडी नजर

त्र्यंबक रोडवरील निकृष्ट रस्ता जेसीबीने उखडल्यानंतर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचा कडक पवित्रा; १,२३० कोटींच्या २८ रस्त्यांची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथक गठीत

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्र्यंबक रोडवरील वेदमंदिर समोर नव्याने केलेल्या 'व्हाइट टॉपिंग' रस्त्याला अवघ्या काही दिवसांतच तडे गेल्याने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी कडक पावले उचलली आहेत. निकृष्ट दर्जाचा हा संपूर्ण रस्ता जेसीबीने खोदून काढण्याचे आदेश देत आयुक्तांनी संबंधित कंत्राटदार कंपनीला प्रतिदिन १ लाख ८४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या घटनेनंतर, कुंभमेळ्याच्या पहिल्या टप्प्यातील १,२३० कोटी रुपयांच्या सर्व २८ प्रमुख रस्त्यांच्या कामांची रोजच्या रोज सखोल गुणवत्ता तपासणी करण्यासाठी महापालिकेने विशेष तपासणी पथक नियुक्त केले आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल १,२३० कोटी रुपये खर्चून २८ प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेचा बांधकाम विभाग, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनी (PMC) आणि महापालिकेचा गुणवत्ता व नियंत्रण विभाग अशी त्रिस्तरीय (थ्री-टियर) यंत्रणा कार्यरत असतानाही, कंत्राटदारांकडून गुणवत्तेशी तडजोड केली जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे.

वेदमंदिर समोरील रस्ता जेसीबीने खोदला
त्र्यंबक रोडवरील खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नल दरम्यानच्या रस्त्यावर मेसर्स अजमेरा या कंपनीकडून 'व्हाइट टॉपिंग'चे काम सुरू आहे. मात्र, वेद मंदिरासमोर नव्याने टाकण्यात आलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला सुमारे २५ मीटर लांबीपर्यंत मोठे तडे गेल्याचे आढळून आले. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, काँक्रीटच्या पॅनेलमध्ये मानकांपेक्षा अधिक तांत्रिक दोष आढळले. अपेक्षित दर्जा नसल्याचे स्पष्ट होताच आयुक्तांनी तो खराब भाग पूर्णपणे काढून पुन्हा नव्याने काम करण्याचे आदेश दिले, ज्यानुसार तातडीने जेसीबीच्या साहाय्याने रस्ता उखडण्यात आला.

या निकृष्ट कामासाठी कंत्राटदार कंपनीला प्रतिदिन १ लाख ८४ हजार रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी याच कंत्राटदाराने गोल्फ क्लबजवळ डक्टचे काम खराब केल्याबद्दल ५० हजार रुपयांचा दंड भरला होता. गेल्या आठवड्यातही मनपाने केलेल्या वेगवेगळ्या तपासणीत शहरातील एकूण १२ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.

रोज होणार गुणवत्ता तपासणी
कंत्राटदारांच्या वारंवार समोर येणाऱ्या निष्काळजीपणाला चाप लावण्यासाठी आयुक्तांनी आता रोजच्या रोज कामाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष उच्चस्तरीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे अधिकारी पाटील यांच्यासह बांधकाम विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे.

हे पथक कुंभमेळ्याच्या सर्व २८ रस्त्यांच्या कामांची रोज तपासणी करून त्याचा अहवाल थेट आयुक्तांना सादर करेल. जर कामे टेंडरमधील कायदेशीर अटी आणि मानकांनुसार केली जात नसल्याचे आढळले, तर ते निकृष्ट काम तातडीने काढून टाकण्याचे आणि दंडाची रक्कम वाढवण्याचे पूर्ण अधिकार या विशेष पथकाला देण्यात आले आहेत.

या २८ रस्त्यांची होणार रोज तपासणी
महापालिकेने पुढील २८ प्रमुख मार्गांची नियमित गुणवत्ता तपासणी करण्याचे निश्चित केले आहे:
१. बारदान फाटा ते सुला चौक.
२. पपया नर्सरी ते एक्स्लो जंक्शन.
३. एक्स्लो चौक ते गरवारे चौक.
४. वडनेर गेट ते विहितगाव.
५. विहितगाव - बिटको चौक - जेलरोड.
६. नांदूर पूल ते जत्रा हॉटेल.
७. लेखानगर - वडाळा गाव - रविशंकर मार्ग.
८. मिरची हॉटेल - तारवालानगर - मखमलाबाद.
९. शरणपूर - चांडक सर्कल - महामार्ग बसस्थानक.
१०. विजयममता ते टाकळी गाव.
११. अशोकस्तंभ - जेहान सर्कल.
१२. गंगापूर रोड - गंगापूर गाव.
१३. खडकाळी चौक - आयटीआय सिग्नल.
१४. आयटीआय सिग्नल - पिंपळगाव बहुला.
१५. निमाणी चौक - मनपा हद्द दिंडोरी रोड.
१६. पेठ रोड - मेहेरधाम.
१७. दत्तमंदिर चौक - सिन्नर फाटा.
१८. जनार्दन स्वामी मठ - ड्रीम सिटी चौक.
१९. मालधक्का रोड - रेल्वे स्टेशन.
२०. छ. शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. आंबेडकर चौक.
२१. अमृत मिरवणूक मार्ग.
२२. मुंबई नाका - गडकरी चौक - त्र्यंबक नाका.
२३. चांदशी पूल - जेहान सर्कल - सिटी सेंटर मॉल.
२४. सिटी सेंटर मॉल - इंदिरानगर अंडरपास.
२५. टाकळी मलनिस्सारण ते मखमलाबाद रस्ता.
२६. पिंपळगाव खांब - वडनेर गेट.
२७. पाथर्डी फाटा - पिंपळगाव खांब.
२८. चोपडा लॉन्स ते मखमलाबाद रस्ता.

Key Points Summary

  • त्र्यंबक रोडवरील निकृष्ट 'व्हाइट टॉपिंग' रस्ता मनपा आयुक्तांच्या आदेशाने जेसीबीने उखडला.

  • निकृष्ट कामासाठी मेसर्स अजमेरा कंत्राटदार कंपनीला प्रतिदिन १ लाख ८४ हजार रुपयांचा दंड.

  • कुंभमेळ्याच्या पहिल्या टप्प्यातील १,२३० कोटींच्या २८ प्रमुख रस्त्यांच्या कामांची रोज होणार तपासणी.

  • त्रिस्तरीय देखरेख यंत्रणा अपयशी ठरल्याने अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथक नियुक्त.

  • टेंडरमधील मानकांनुसार काम न झाल्यास निकृष्ट काम पूर्णपणे उखडण्याचे आणि दंड वाढवण्याचे पथकाला अधिकार.

  • शहरातील सर्व २८ रस्त्यांच्या कामांची यादी जाहीर करून नियमित ऑडिट सुरू.