

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोटी-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रस्त्यालगतच्या जमीनधारकांनी सर्वेक्षणाला दाखवलेला तीव्र विरोध आता मावळला असून जिल्हा प्रशासनाने केलेल्या यशस्वी समन्वयानंतर भूसंपादन प्रक्रियेला अधिकृत प्रारंभ झाला आहे. या महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनाची अधिसूचना प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, यामुळे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरातील पर्यटनाला आणि विकासाला मोठी गती मिळणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने घोटी-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. या महामार्गाच्या सर्वेक्षणास रस्त्यालगतच्या जमीनधारकांनी विरोध केल्यामुळे त्यास विलंब होत होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने त्या सर्व जमीन धारकांच्या शंकांचे निरसन केल्यामुळे त्यांचा विरोध मावळला आहे. यामुळे महामार्ग प्रशासनाने भूसंपादनासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली असून लवकरच भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे. हा महामार्ग जव्हार-पालघरला जोडला जाणार असल्याने भविष्यात प्रस्तावित वाढवण बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी याचा फायदा होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महामार्गाचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहे. त्यात काही महामार्गाची नव्याने बांधणी केली जाणार आहे, तर काही ठिकाणी अस्तित्वामधील मार्गाचे चौपदरीकण करण्यात येत आहे. घोटी ते डहाणू हा राष्ट्रीय महामार्ग असून सध्या त्याचे पालघर जिल्ह्यातील काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील घोटी ते अंबोली हे काम सिंहस्थानिमित्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने १२०० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतर्गत घोटी-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे.
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांतील २३ गावांमध्ये या कामासाठी जमीन संपादित केली जाणार आहे. त्यानुसार महामार्ग प्राधिकरणकडून या रस्त्याचे सर्वेक्षण व आरेखन कामास सुरुवात केली असता या मार्गालगतच्या जमीन धारकांनी त्याला विरोध केला. प्रशासनाने पोलिसांच्या संरक्षणात मोजणीला प्रारंभ केला असता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला.
यामुळे या महामार्गाचे भवितव्य अंधारात सापडले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधी व बाधित शेतकऱ्यांच्या बैठकी घेऊन सर्व शंकांचे निरसन केले. त्यामुळे या महामार्गाच्या उभारणीचा विरोध मावळला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या महामार्गासाठी आवश्यक जमीन संपादनासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली.
दोन आठवड्यांमध्ये सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात मुंबईकडून येणाऱ्या भाविकांना त्र्यंबकेश्वर गाठणे सोयीचे होणार आहे. त्यासोबत हा रस्ता पुढे जव्हारमार्गे डहाणू, पालघर व वाढवण बंदराला जोडण्यात येणार आहे. या टप्प्यातदेखील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात नाशिक ते पालघरचा प्रवास अधिक जलद होईल.
हा मार्ग मुंबईहुन त्र्यंबकेश्वरला येणा-या तसेच गुजरातमार्गे त्र्यंबकेश्वरला येणा-या भाविकांसाठी जवळचा ठरणार आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर व इगतपुरी परिसरातील पर्यटनाला या मार्गामुळे चालना मिळणार आहे.
घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्ग भूसंपादन
२३ गावांमध्ये १३२.०९ हेक्टरचे संपादन
रस्त्यासाठी एकूण ६७१ गट बाधित होणार
इगतपुरीत १२, त्र्यंबकला ११ गावांत संपादन
सर्व गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया पूर्ण
Key Points Summary
घोटी-पेगलवाडी-त्र्यंबकेश्वर महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीनधारकांचा विरोध पूर्णपणे मावळला.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील २३ गावांमधील १३२.०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार.
या महत्त्वपूर्ण महामार्ग प्रकल्पासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून १,२०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी.
रस्त्यासाठी एकूण ६७१ गट बाधित होणार असून संयुक्त मोजणीची प्रक्रिया पूर्ण.
कुंभमेळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; मुंबई व गुजरातहून येणाऱ्या भाविकांना थेट त्र्यंबकेश्वरला जाणे सोपे होणार.
हा महामार्ग पुढे जव्हार-डहाणू मार्गे पालघर आणि प्रस्तावित वाढवण बंदराला जोडला जाणार.