

नाशिक (Nashik): मुंबई-नागपूर दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक हायटेक आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महामार्गावर 'इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम' म्हणजेच इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबवण्यासाठी राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये २०० कोटी रुपयांच्या निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वाधिक सुरक्षित आणि 'झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर' (शून्य मृत्यू कॉरिडॉर) बनण्यास मोठी मदत होणार आहे..
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राबवल्या जाणाऱ्या १,७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी या निधीमुळे मोठा वेग मिळणार आहे. समृद्धी महामार्गावरील हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक सहकार्याने साकारला जात आहे. दक्षिण कोरिया आणि जपानमधील प्रगत वाहतूक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा आधार यासाठी घेण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम सुरक्षा मानके भारतात आणण्यासाठी परदेशी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि प्रगत दळणवळण प्रणालीवर आधारित आहे.
असे असणार तंत्रज्ञान
समृद्धी महामार्गावर दर एक किलोमीटरवर दिवस-रात्र स्पष्ट पाहू शकणारे एआय आणि हाय-डेफिनिशन कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच वाहन क्रमांक स्वयंचलित पद्धतीने ओळखणारी प्रणाली यात असल्याने निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्यास अथवा लेन तोडल्यास त्या नियम मोडणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट ही सिस्टीम स्वयंचलितपणे स्कॅन करून त्यांना काही सेकंदात चलन पाठवले जाईल.
वाहनांचा वेग मोजण्यासाठी महामार्गावर अत्याधुनिक स्पीड गन आणि रडार यंत्रणा सक्रिय असेल. फास्टॅगच्या प्रगत आवृत्तीसह क्लोज्ड टोलिंग सिस्टीम याद्वारे वापरली जात आहे. यामुळे टोल भरण्यासाठी वाहने थांबवण्याची गरज पडणार नाही. तसेच समृद्धी महामार्गावर ठिकठिकाणी डिजिटल स्क्रीन बसवल्या जाणार आहेत.
हा होणार फायदा
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून वेगावर नियंत्रण न राहिल्याने झालेले भीषण अपघात रोखणे हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. यामुळे १७ प्रकारच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांवर ही प्रणाली नजर ठेवू शकणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या मोबाईलवर थेट डिजिटल चलान पाठवले जाईल, ज्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चाप बसेल.
एखादे वाहन रस्त्यात अचानक थांबले किंवा अपघात झाला, तर नियंत्रण कक्षाला अवघ्या काही सेकंदांत अलर्ट मिळेल. यामुळे आपत्कालीन रुग्णवाहिका आणि क्विक रिस्पॉन्स व्हेईकल तत्काळ घटनास्थळी रवाना होऊ शकतील. रिअल-टाइम हवामान आणि वाहतूक अपडेट्स: रस्त्यावरील डिजिटल बोर्ड्सद्वारे चालकांना पुढील हवामान, पाऊस, धुके किंवा पुढे झालेला अपघात याविषयी आधीच माहिती मिळू शकणार आहे. यामळे वाहनचालकांना निर्णय घेणे सोपे जाईल.