Pune Railway Station Tendernama
पुणे

Pune : पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा गोंधळ कमी होणार; आता 1 तास आधीच...

Pune Railway Station : प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने स्थानकाचा आढावा घेतला. त्यात काही उणिवा आढळल्या.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ज्या रेल्वेने प्रवास करायचा आहे, ती कोणत्या फलाटावर येईल, हे आता एक तास आधीच कळणार आहे. (Pune Railway Station News)

याबाबत पुणे रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला असून, सोमवारपासून (ता. १७) त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयाचा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व गर्भवतींना फायदा होणार आहे.

प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने स्थानकाचा आढावा घेतला. त्यात काही उणिवा आढळल्या असून, त्यावर तत्काळ काम करण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांनी प्रशासनाला दिला.

त्यात पुणे स्थानकावर फलाटांच्या माहितीची उद्‍घोषणा एक तास आधीच केली जाणार आहे. डब्यांच्या संख्येवरून आधीच फलाट ठरलेला असतो. त्यामुळे फलाटाच्या क्रमांकातही फारसा बदल न करण्याची सूचना त्यांनी केली.

कसे करणार गर्दीचे व्यवस्थापन?

- पुणे विभागात सर्वाधिक गर्दी होणाऱ्या स्थानकांची निवड

- पुणे, दौंड, मिरज, कोल्हापूर व अहिल्यानगर स्थानकांचा समावेश

- उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेच्या जनरल डब्यातील प्रवाशांसाठी रांगेची पद्धत

- प्रत्येक स्थानकावर प्रतीक्षा क्षेत्र (होल्डिंग एरिया) स्थापन करणार

- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढविणार

पुणे स्थानकावर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखल्या आहेत. स्थानकावर अधिकारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची गस्त असेल.

- पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे