कात्रज (Katraj) : कात्रज उड्डाणपुलाच्या (Katraj Flyover) कामाचे २४ सप्टेंबर २०२१ रोजी उद्घाटन झाले. या घटनेला जवळपास आता चार वर्षे होतील. काम पूर्ण करण्याची मुदत २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत होती. त्यानंतर दोन वेळा उड्डाणपुलाच्या कामासाठी मुदतवाढ घेण्यात आली. मात्र, उड्डाणपुलाची सद्यःस्थिती पाहता पुन्हा एकदा मुदतवाढ घेण्याची नामुष्की ओढवणार आहे.
कामाची गती बघता उड्डाणपुलाच्या लोकार्पणासाठी डिसेंबर २०२६ उजाडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता पुलाच्या पूर्ततेसाठी डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जूनच्या पूर्वार्धात भूसंपादन झाल्यास आगामी सहा महिन्यांत हा पूल साकारणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते. मात्र, जूनच्या मध्यापर्यंत याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही. आतापर्यंत झालेले काम, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादन करण्यास लागणारा वेळ पाहता डिसेंबर २०२५ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे अशक्य आहे.
चौकातील वाहतूक कोंडी आणि भूसंपादनाच्या अडथळ्यांची शर्यत पार करत उड्डाणपुलाचे काम निम्म्यापर्यंत आले आहे. मात्र, आता उड्डाणपूल उतरविण्यासाठी राजस सोसायटी चौकातील एकूण ११ जागा अडथळा ठरत होत्या. त्या जागा ताब्यात घेणे अत्यंत गरजेचे असताना यामधील केवळ सात जागा ताब्यात आलेल्या आहेत. मालमत्ता विभागाने आता जागा ताब्यात घेण्याचा चेंडू भूसंपादन विभागाच्या कोर्टात टोलवला आहे.
भूसंपादन विभागाकडून जागांची नुकतीच मोजणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर भूमिअभिलेख विभागातील मोजणीदारांच्या आंदोलनाचा मोजणी प्रक्रिया आणि भूसंपादनाला फटका बसल्याचे दिसून येत आहे.
उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला महापालिका आणि इतर विभागांनी सहकार्य करून हे काम जलदगतीने करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
उड्डाणपूल दृष्टीक्षेपात...
- एकूण निधी : १६९.१५ कोटी रुपये
- उड्डाणपुलाचा मार्ग : वंडरसिटी ते माऊली गार्डन
- उड्डाणपुलाची लांबी : १३२६ मीटर
- उड्डाणपुलाची रुंदी : २५.२० मीटर (सहापदरी)
- दोन्ही बाजूंस ७ मीटर सेवा रस्ता
- वंडरसिटी ते कात्रज चौक ५.५ मीटर रुंद स्लीप मार्ग
उड्डाणपुलाची सद्यःस्थिती
- कार्यारंभ आदेश : २५ फेब्रुवारी २०२२
- मुदतवाढीसह काम पूर्ण होण्याची तारीख : डिसेंबर २०२५
- एकूण १९ गाळ्यांपैकी १० दहा गाळ्यांचे काम पूर्ण
- कात्रज चौकातील अवघड टप्पा पूर्ण
जागेचे भूसंपादन आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होत आहे. त्यानुसार आता गती मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला जूनअखेरपर्यंत जागा मिळाली तर आम्ही डिसेंबर २०२५ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण