Chakan Tendernama
पुणे

Chakan MIDC : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय; 'या' रस्त्यावर आता एकेरी वाहतूक

Traffic Police : वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी महाळुंगे वाहतूक विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे.

टेंडरनामा ब्युरो

तळेगाव स्टेशन (Talegaon Station) : तळेगाव-शिक्रापूर महामार्गासह चाकण औद्योगिक क्षेत्रातील (Chakan MIDC) महाळुंगे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने महाळुंगे वाहतूक विभागाच्या हद्दीत गुरुवारपासून (ता. ५) प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे.

महाळुंगे पोलिस ठाणे चौक, सिग्मा सर्कल चौक, इंड्यूरन्स चौक, महिंद्रा सर्कल चौक, एच. पी. चौक या रस्त्यांवर जड, अवजड, हलकी वाहने आणि कंपनी बसेस आदी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच दुहेरी वाहतुकीस रस्ता अपुरा पडत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

त्यावर उपाययोजना म्हणून यापूर्वीचे निर्बंध रद्द करून तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतुकीचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी दिले आहेत. दरम्यान, वाहतूक बदलाच्या पहिल्याच दिवशी बहुसंख्य वाहनचालकांना माहिती नसल्याने गोंधळ उडाला. एचपी चौक ते महाळुंगे दरम्यान काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती.

‘नो एंट्री’ व पर्यायी मार्ग

- चाकण-तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे पोलिस ठाणे चौकाकडून एच. पी. चौकाकडे जाण्यास बंदी. पर्यायी मार्ग ः महाळुंगे पोलिस ठाणे चौकातून डावीकडे वळून इंड्यूरन्स चौकमार्गे इच्छितस्थळाकडे

- इंड्यूरन्स चौकाकडून महाळुंगे पोलिस ठाणे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी. पर्यायी मार्ग ः इंड्यूरन्स चौक ते एच. पी. चौकमार्गे इच्छितस्थळाकडे

- एच. पी. चौकाकडून इंड्यूरन्स चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग ः तळेगाव-चाकण रस्त्याने एच. पी. चौक ते महाळुंगे पोलिस ठाणे चौकमार्गे इच्छितस्थळाकडे

एकेरी मार्ग

- एच. पी. चौकातून महाळुंगे पोलिस ठाणे चौक

- महाळुंगे पोलिस ठाणे चौक ते इंड्यूरन्स चौक

- इंड्यूरन्स चौक ते एच. पी. चौक

हरकती सूचना नोंदवा

वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी महाळुंगे वाहतूक विभागाकडून गुरुवारपासून (ता. ५) प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे. वाहनचालकांसह नागरिकांनी याबाबत आपल्या सूचना व हरकती पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखा उपायुक्त कार्यालयात १९ डिसेंबर २०२४ पर्यंत कळवाव्यात. त्यांचा विचार करून प्रवेश बंदी व एकेरी वाहतुकीबाबत अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

महाळुंगे गावातील ओढ्यावरील अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी होते. सगळीकडे समांतर दोन पूल आणि बाह्यवळण रस्ते झाले. पण, महाळुंगे गावात एकच पूल आहे. फक्त दोनच वाहने एकावेळी जाऊ शकतात. हा जीर्ण पूल कधीही पडू शकतो. याबाबत कुणीही गांभीर्याने घेत नाही. शासनाने महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू करून मूळ समस्या प्रशासन आणि रस्ते विभागाने त्वरित सोडवावी.

- धनंजय गाडे, स्थानिक, महाळुंगे

एकेरी वाहतुकीच्या निर्णयाचा काही दिवस वाहनचालकांना त्रास होईल. मात्र, या नियोजनामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होऊन वेळ वाचेल आणि दिलासा मिळेल. तळेगाव-चाकण रस्त्यासह चाकण एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याहेतूने एकेरी वाहतुकीचे पालन करावे. स्थानिकांसह कामगार, उद्योजक आणि वाहनचालकांचे सहकार्य अपेक्षित आहे.

- प्रदीप पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महाळुंगे वाहतूक विभाग