
मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे वसईच्या खाडीवर प्रस्तावित डबल डेकर ब्रीजला गती मिळेल अशी चिन्हे आहेत. सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या या पुलावर मेट्रो आणि वाहनांना एकाचवेळी ये-जा करता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
वसई-भाईंदर खाडीवर राज्यातील दुसरा डबल डेकर पूल बांधला जाणार आहे. एकाच खांबावर मेट्रो रेल्वेचे ट्रॅक आणि खाली वाहनांसाठी रस्ता अशी रचना असेलला हा पूल असणार आहे. वसई ते भाईंदर असा प्रवास करायचा झाल्यास सध्या रस्ता मार्गेच जावे लागते. मुंबई अहमदाबाद महामार्ग हा वसई आणि भाईंदरला जोडणारा एकमेव मार्ग आहे. यामुळे या प्रवासात खूप वेळ जातो. डबल डेकर पुलामुळे वसई आणि भाईंदरला रस्ते आणि मेट्रोने प्रवास करता येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातूनच भाईंदर - नायगावमध्ये हा डबल डेकर पूल तयार करण्यात येणार आहे. या पुलावर एकूण ३ लेन असणार आहेत. या पुलाची लांबी सुमारे ५ किलोमीटर इतकी असेल. तर, हा ब्रीज ३०.६० मीटर रुंद असेल. या डबल डेकर पुलाच्या वरच्या डेकवर मेट्रो रेल्वेचे ट्रॅक असणार आहेत. म्हणजेच वरच्या डेकवरुन मेट्रो रेल्वे धावणार आहे. तर, खालच्या डेकवर वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्ता असणार आहे. या डबल डेकर पुलामुळे वसई विभागातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे.
तसेच या पुलामुळे वसई शहराला मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. राज्य सरकारने मेट्रो 13 ची घोषणा केली होती. याअंतगर्त मीरा रोड ते विरार हा 23 किलोमीटरचा मेट्रो मार्ग बांधला जाणार आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 20 स्थानकांचा समावेश असेल. भाईंदर नायगांव मेट्रोसहित खाडीपूल करण्याबाबतचा संरचनात्मक आराखडा तयार केला जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी 9 जुलै 2024 रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे लवकरच या डबल डेकर प्रकल्पाला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील पहिला डबल डेकर पूल नागपुरात आहे.