
मुंबई (Mumbai) : नव्या वर्षात मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी अंधेरीमधील गोखले पूल, मस्जीद बंदरचा कर्नाक आणि विक्रोळीचा उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याचे मुंबई महापालिकेने (BMC) स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या डेडलाईननुसार गोखले पूल एप्रिल २०२५, कर्नाक पूल मे २०२५ तर विक्रोळी उड्डाणपूल मार्च २०२५ मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत होत असलेली वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार आहे. या तिन्ही पुलांचे काम सुरू असल्याने त्या त्या परिसरात मोठ्या वाहतूककोंडीने मुंबईकर हैराण आहेत.
अंधेरीचा गोखले ब्रीज 3 जुलै 2018 रोजी कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.
त्यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने, तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत.
1975 मध्ये बांधण्यात आलेला गोखले पूल कोसळल्यानंतर रेल्वे हद्दीतील भाग धोकादायक असल्याने महापालिकेने त्याचे काम हाती घेतले आणि 7 नोव्हेंबर 2022 पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
विक्रोळीमध्ये अनेक प्रवासी-वाहनचालक रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडून पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करीत असल्याने अपघात घडत होते. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी करण्यात येत होती.
यानुसार महापालिकेने हे काम हाती घेतले होते. मात्र पुलाच्या आराखड्यात अनेक वेळा झालेले बदल आणि कोरोना काळाचा फटका बसल्याने हे काम रखडले होते. मात्र हे काम आता वेगाने सुरू असून मार्च 2025 पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी मस्जिद बंदर येथील कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. 154 वर्षे हा जुना पूल जीर्ण झाल्याने महापालिकेच्या माध्यमातून नव्याने बांधण्यात येत आहे.
या पुलाचे गर्डर बसवण्याचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार असून पुढील पावसाळ्याआधी हा पूल सुरू होणार असल्याचा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.