Aurangabad
Aurangabad Tendernama
मराठवाडा

Aurangabad: संग्रामनगर अंडरपास खड्ड्यात कोणी घातला?; पुलाची उंची..

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : कोणी घातला संग्रामनगर अंडरपास खड्ड्यात विभागीय आयुक्त शोधणार का? पुलाची उंची वाढणार का? असे म्हणत सातारा-देवळाईकरांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना साकडे घातले आहे. सदोष पुलाच्या बांधकामामुळे झालेल्या कोंडीतून वाट काढत येथील नागरिकांनी आपला कामातून वेळ काढून पंधरा ते वीस किलोमीटर अंतर कापत आयुक्त केंद्रेकरांना निवेदन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. तेथे साहेब, मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. यानंतर माघार न घेता नागरिकांनी उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी यांना निवेदन दिले. आता सरकारी यंत्रणेत कडक शिस्तीचे तसेच सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रेकर सदोष संग्रामनगर पुलाबाबत काय निर्णय घेतात, याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागून आहे.

औरंगाबाद बीड बायपास राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी टी ते संग्रामनगर अंडरपास पुलामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या पुलाची उंची मुख्य रस्त्यांपेक्षा कमी झाल्यामुळे कारभाऱ्यांनी सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्यांचे खोदकाम करून अंडरपास खड्ड्यात घातला आहे. इतके करूनही अंडरपासची उंची वाढत नसल्याने अंडरपास अधिकाधिक खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतकेच नव्हे, तर झालेली चुक लपवण्यासाठी देवानगरी उड्डाणपुलाखालचा रस्ता खोदुन अंडरपासचे रस्ते मिळवण्याचा घाट घातला जात आहे.

परिणामी देवानगरी उड्डाणपुलाकडून संग्रामनगर उड्डाणपुलादरम्यान चढ-उतार केला जात आहे. संग्रामनगर उड्डाणपुलाखालचे मुख्य रस्ते पंधरा फुट खोल गेल्याने पावसाळ्यात संग्रामनगर पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी सातारा-देवळाईतील जनसेवा नागरी कृती समिती, सातारा-देवळाई विकास समिती, संघर्ष कृती समिती, जनसेवा महिला नागरी कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांकडे केली आहे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत जनसेवा नागरी कृती समितीचे अध्यक्ष बद्रीनाथ थोरात, रामदास मनगटे, आबासाहेब देशमुख, दिपक सुर्यवंशी, मधुकर पाटील, असद पटेल यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना निवेदन दिले आहे. केंद्रेकर मुख्यमंत्र्यांसोबत व्ही.सी. मिटींगमध्ये व्यस्त असल्याने उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी यांनी निवेदन स्विकारले.

त्यात नागरिकांनी म्हटले आहे की, पैठण जंक्शनपासून तर झाल्टा फाटा-जालनारोडपर्यंत सातारा - देवळाई - बाळापुर '- गांधेली - चिकलठाणा - मुकुंदवाडी - झाल्टा - आडगाव - निपानी - सुंदरवाडी - जालनारोड हद्दीलगतचा हा भाग मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. पुन्हा नव्याने विकसित होत आहे. अत्यंत वर्दळीच्या असलेल्या पैठण जंक्शन ते झाल्टा फाटा पर्यंत या मार्गावर देवानगरी, रेल्वेस्टेशन उड्डाणपुल आणि देवानगरी भुयारीमार्गाचाच औरंगाबाद शहरात जाण्यासाठी नागरिक या पर्यायी मार्गाचा वापर करतात. तसेच कमलनयन बजाज रूग्णालय, एमआयटी, चाटेस्कुल यासह अनेक मोठ्या शिक्षण संस्था, शासकीय निमशासकीय कार्यालये , वित्तीय संस्था या भागात आहेत. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरिकरण आणि व्यावसायिकरण झाले आहे. त्यामुळे संग्रामनगर चौकातील सदोष उड्डाणपुलाखालील अंडरपासलगत रोजच वाहतूक समस्येचा सामना करावा लागत आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाची देखील अद्याप कागदी कोंडी फुटत नाही.

अंडरपास की अंडरफास

मृत्युचा राष्ट्रीय महामार्ग बीड बायपास अशी देशभरात ओळख असलेल्या बीड बायपास महामार्गाचे हायब्रीड ॲन्युईटी एयु-१७७ प्रकल्पांतर्गत रूंदीकरण, सेवा रस्ते, आठ ठिकाणी छोटे पुल, तीन उड्डाणपुल उभारण्यात आले. काँक्रिट कामानंतर या रस्त्याची उंची वाढली आहे. तुलनेत तिन्ही उड्डाणपुलाखालील अंडरपासची उंची कमीच आहे. त्यात संग्रामनगर उड्डाणपुल आणि अंडरपासची उंची अधिक कमी असल्यामुळे अंडरपास मार्गातील सुपासारखे उतार असलेले मुख्य रस्ते खोदून अंडरपास पंधराफुटापर्यंत सखल भागात गेला आहे. त्यात पावसाळी पाणी निचरा होणारी व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याचा दावा जरी जागतिक बँक प्रकल्पातील अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे, कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे, उप अभियंता शैलेश सुर्यवंशी, शाखा अभियंता सुनिल कोळसे करीत असले तरी थोड्या पावसातच अंडरपासमध्ये पाणी साचेल. त्यामुळे वाहतूक ठप्प होईल. परिणामी, नागरिक व वाहनचालकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागणार आहे. अंडरपासची उंची कमी असल्यामुळे सद्यःस्थितीत वाहतुक ठप्प होत आहे. अंडरपासच्या रस्त्यांचे काम झाल्यावर खालुन उंची वाढेल व अंडरपासची उंची अजुन कमी होईल.

विभागीय आयुक्त याकडे लक्ष देतील का?

जागतिक बँक प्रकल्प शाखेतील कारभाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करून जालनारोड येथील अंडरपासच्या धर्तीवर येथील अंडरपासची उंची वाढवावी. आमदाररोडसमोर पर्यायी अंडरपास तयार करण्यात यावा, शिवाजीनगर, फुलेनगर उस्माणपुरा, बाळापुर, चिकलठाणा येथील भुयारी मार्गाचा तिढा सोडवावा, रेल्वे स्टेशन एमआयडीसी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ते निर्लेप बीड वळण मार्गाला जोडणारा उड्डाणपुल तयार करावा, मुकुंदवाडी झेंडा चौक ते विश्रांतीनगर, झेंडा चौक ते बाळापुर रेल्वेफाटक ते बीड वळण मार्गाला जोडणाऱ्या शहर विकास आराखड्यातील शंभर फुटी रोडचे रूंदीकरण करून पक्का रस्ता बांधण्यात यावा, औरंगाबाद रेल्वेस्थानक ते चिकलठाणा स्थानकादरम्यान रेल्वे रूळानजीक वसाहतधारकांसाठी पादचारी लोखंडी पुल बांधावेत त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.

प्रशासन जबाबदार

गेल्या दोन वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे नव्वद टक्के काम झाल्याचा दावा प्रशासन करत आहे. आत्तापर्यंत रस्ता वाहतुकीस खुला होता. मात्र तिन्ही पुलांच्या कामाकरिता महामार्गावरील वाहतूक बंद केल्याने ऐन परिक्षांच्या काळात या भागातील वाहतुक विस्कळीत झाली आहे. याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.