छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी छत्रपती संभाजीनगरात महापालिकेतर्फे शाळा सुरू आहेत. एकीकडे छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीतील महानगरपालिका शाळातील शिकणाऱ्या मुलांना उत्कृष्ट शालेय शिक्षण मिळावे यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवत आहे. ह्या प्रकल्पांतर्गत मनपाच्या ५० शाळांचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आल्याचा दावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून केला जात आहे. दुसरीकडे पीएमश्री योजनेंतर्गत निवड झालेल्या आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतील जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांचा विकास कामांचा गवगवा सुरु आहे. त्या अनुषंगाने शालेय इमारत व संरक्षण भिंतींची रंगरंगोटी, परसबाग निर्मिती, वनस्पती विभाग व हिरवळ व शोभिवंत वृक्ष यांच्या लागवडीची पूर्व तयारी सुरू असल्याचा गवगवा सुरू आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरातील महानगरपालिकेच्या शाळांची वेगळीच स्थिती आहे. आहे शहरातील जीन्सी भागातील रेंगटीपूरा उर्दू व मराठी प्राथमिक शाळेला अतिक्रमणाचा विळखा आहे.
येथील उर्दू व मराठी प्राथमिक शाळा ही तेथील शिक्षक, शिक्षण अधिकाऱ्यांच्या व महापालिका घन कचरा व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे विद्येच्या प्रांगणासमोरच मोठ्या प्रमाणात कचरपट्टी झाली आहे. अनेकांना आता हा शाळा परिसर कचरा डेपो करून टाकला आहे. विशेष म्हणजे काहींना शाळेलगत भुखंड ही आपलीच मालमत्ता असल्याचे वाटायला लागले आहे. या शाळेसमोर काहींनी अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. दुसरीकडे भंगार वाहनांची वाहनतळ करून टाकले आहे. मात्र याकडे महापालिकेतील नगर रचना विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, स्वछता विभाग व पोलीस प्रशासनही लक्ष द्यायला तयार नाही. काही पालकांनी अतिक्रमण व कचर्याबाबत संबंधित विभागांकडे तक्रारी केल्यातरी कारभार्यांना निपटारा करण्यासाठी वेळ मिळत नाही. आपला पाल्य हा शिकला पाहिजे, मोठा अधिकारी किंवा मोठा व्यावसायिक झाला पाहिजे, हे प्रत्येक पालकाला वाटत असते. पण आर्थिक परिस्थीती आणि महागाईमुळे काही पालक आपल्या पाल्यांना महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवतात. हातावर आणून पानावर खाण्याची परिस्थिती असणारे बहुसंख्य गरीबांचे मुले कधी अनवाणी पायाने तर कधी फाटलेले कपडे घालून का होईना, दररोज शाळेत हजेरी लावतात.
ज्या शाळेत मुले शिक्षण घेतात त्या शाळेत जायला रस्ता नाही, पटांगण आहे पण पाऊस आला तर पटांगणाला स्विमिंग पुलाचे स्वरूप येते. शहरात महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे मोडकळीस आलेल्या अनेक शाळा आहेत. पण जुन्या शहरातील म्हणजे संजयनगर - बायजीपूर्याला लागून असलेल्या खास गेट मागील उर्दू व मराठी प्राथमिक शाळा हे चांगलेच उदाहरण आहे. अनेक मुस्लिम बांधवांचे इतर सर्व जातीधर्मातील पाल्य या शाळेत विद्याग्रहण करायला येतात. परंतु, शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या काही अंतरावरच भंगार वाहनांची वाहनतळ तसेच कचरा डंपींग ग्राउंड आहे. रात्रीच्या वेळी शाळा परिसरात ओपण दारु अड्डा आणि अमली पदार्थांच्या सेवन करणार्यांची गर्दी जमा होत असल्याने येथे फुटलेल्या बाटल्यांच्या काचा तुडवत विद्यार्थ्यांना पायवाट शोधावी लागते. शाळेलाच लागूनच काही अवैद्य दारू विक्रेते दारू विक्रीचा व्यवसाय तर करतातच याशिवाय सट्टापट्टी घेणाऱ्यांची व लावणाऱ्यांची गर्दी या परिसरात नेहमीच असते. अतिक्रमणमुळे विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शाळेसमोर असणारे चिखल, कचरा, पाणी साचलेले आहे. एकीकडे स्वच्छतेच्या नावावर अव्वल क्रमांक पटकविणारी महानगरपालिका आणि दुसरीकडे स्वच्छतेच्या नावावर करोडपती बनलेले कंत्राटदार यांना शाळेसमोरचे चित्र दिसत नसावे. त्यामुळे परिसरात स्वच्छतेचे बारा वाजल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शाळेसमोर हा सर्व प्रकार सुरु असताना या भागातील राजकीय पक्ष गप्प का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे .त्यामुळे या समस्येकडे लक्ष देऊन परिसरात स्वछता आणि बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
"टेंडरनामा" या शाळेतील समस्या मांडत असताना जुना बाजार प्राथमिक शाळेच्या मोडकळीस आलेल्या इमारतीचा मुद्दाही समोर आला. एकीकडे महानगरपालिका स्मार्ट सिटी महानगरपालिका शाळांतील शिकणाऱ्या मुलांना उत्कृष्ट शालेय शिक्षण मिळावे यासाठी स्मार्ट स्कूल प्रकल्प राबवत आहे. ह्या प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेच्या ५० शाळांचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केल्याचा दावा ठोकत आहे.या प्रकल्पात शाळेतील गरजेची बांधकाम दुरुस्ती, ह्यामध्ये वॉटरप्रूफिंग, उन्हाळ्यात वर्ग तापले जाऊ नये म्हणून छतावर इंसुलेटेड पफ पैनल बसवणे, ग्रिल, दरवाजे आणि सलाईडींग खिडक्या बसवणे, वर्गाना आतून आणि बाहेरून रंगवणे याचा समावेश आहे. यावर कोट्यावधींचा खर्च करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार शहरातील महापालिकेच्या शाळांना डिजिटल करण्यात आले असल्याचा दावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन करत आहे.यासाठी स्मार्ट सिटी कडून या प्रकल्पातील शाळांमध्ये प्रत्येक वर्गात इंटरऍक्टिव्ह बोर्ड, व्हाइट बोर्ड, विज्वलायझर कम्प्युटर, स्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक शाळेत स्कॅनर व झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगत आहे. प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक साठी डेस्क आणि आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गतवर्षी ५० शाळा सुसज्ज करण्यात आल्या, असा त्यांनी दावा केला आहे. मात्र इतर शाळांची स्थिती पाहता डिजिटल शाळांच्या स्थितीवर देखील संशय बळावत आहे.